अमिताभ बच्चन यांच्याविषयी मस्करी केल्याने भडकला अभिषेक; मधेच सोडला शो

"वडिलांना का मध्ये आणता?", अभिषेक बच्चनने व्यक्त केला राग

अमिताभ बच्चन यांच्याविषयी मस्करी केल्याने भडकला अभिषेक; मधेच सोडला शो
Abhishek Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 06, 2022 | 3:52 PM

मुंबई- आपल्या वडिलांबद्दल जर कोणी काही नकारात्मक बोलत असेल, तर कोणत्याच मुलाला किंवा मुलीला ती गोष्ट अजिताब आवडणार नाही. असंच काहीसं सध्या अभिनेता अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) घडलंय. अभिषेकने नुकतीच ‘केस तो बनता है’ (Case Toh Banta Hai) या शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात तो पाहुणा म्हणून पोहोचला होता. मात्र कॉमेडीदरम्यान त्याला वडिलांचा विषय आणणं पटलं नाही. अखेर नाराज अभिषेकने या शोमधून काढता पाय घेतला.

रितेश देशमुख, परितोष त्रिपाठी आणि कुशा कपिला यांच्या ‘केस तो बनता है’ या नव्या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या शोमध्ये अभिषेकने पाहुणा म्हणून हजेरी लावली. यावेळी सेटवर मजा-मस्करीचं वातावरण होतं. तेव्हा एका मस्करीवरून अभिषेकचा पारा चढला. कॉमेडियन परितोष त्रिपाठीसमोर अभिषेकने नाराजी व्यक्त केली. कारण त्याने अमिताभ बच्चन यांच्याविषयी मस्करी केली होती. ही मस्करी अभिषेकला आवडली नाही आणि त्यावर त्याने लगेच प्रतिक्रिया दिली. यामुळे शूटिंग मध्येच थांबवावी लागली.

शूटिंग थांबवत अभिषेक म्हणतो, “हे खूप अती झालं. मला खेळात सहभागी करा, पण पालकांना मधे आणणं मला पटत नाही. मस्करी माझ्यापुरतीच मर्यादित ठेवा, वडिलांना का मधे आणता? हे चांगलं नाही वाटत. ते माझे वडील आहेत. त्यांच्याबाबत मी हळवा आहे. कॉमेडीच्या पडद्याआड आपल्याला हे सर्व करायला नाही पाहिजे. मी मूर्ख नाही.” हे बोलून अभिषेक तिथून निघून जातो.

सोशल मीडियावर सध्या हा प्रोमो चांगलाच व्हायरल होतोय. अभिषेकने प्रँक केला की काय, असा प्रश्न काही नेटकरी विचारत आहेत. या शोदरम्यान अनेकदा असे प्रँक केले गेले आहेत. मात्र नेमकं काय घडलं, हे एपिसोड प्रसारित झाल्यानंतरच कळू शकेल.