मला बेपत्ता व्हायचंय..; अभिषेक बच्चनची पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

सोशल मीडियावर जेमतेम सक्रिय असणाऱ्या अभिषेक बच्चनने नुकतीच एक अशी पोस्ट लिहिली आहे, जी वाचून नेटकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्या आहेत का, असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मला बेपत्ता व्हायचंय..; अभिषेक बच्चनची पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता
अभिषेक बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 19, 2025 | 10:52 AM

अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. परंतु या चित्रपटानंतर तो सोशल मीडियावर एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अभिषेकला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ट्रोलर्सना तो अनेकदा सडेतोड उत्तरंही देताना दिसतो. परंतु यावेळी त्याने असं काहीच केलं नाही. किंबहुना त्याने इन्स्टाग्रामवर काही ओळी शेअर केल्या आहेत. या पोस्टद्वारे अभिषेकने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मला एकदा बेपत्ता व्हायचंय’ अशी इच्छा त्याने या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. त्यामुळे नेमकं काय झालंय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अभिषेक बच्चनची पोस्ट-

‘मैं एक बार लापता होना चाहता हूँ, भीड में खुद को फिर से पाना चाहता हूँ| जो कुछ भी था, सब दे दिया अपनों के लिए, अब जरा सा वक्त, बस अपने लिए चाहता हूँ|’ (मला एकदा बेपत्ता व्हायचंय. लोकांच्या गर्दीत पुन्हा स्वत:लाच भेटायचं आहे. जे काही होतं, ते सर्व मी माझ्या जवळच्या माणसांना दिलं, आता फक्त थोडीशी वेळ मला माझ्यासाठी हवी आहे), अशी पोस्ट अभिषेकने शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘कधी कधी स्वत:ला भेटण्यासाठी सर्वांपासून ‘missing’ (बेपत्ता) व्हावं लागतं.’

अभिषेकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तू एक तारा आहेस आणि सदैव तू चमकत राहशील, हीच आमची देवाकडे प्रार्थना आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू कबड्डीसाठी खूप काही केलं आहेस. काही दिवसांसाठी हिमाचल प्रदेशला ये, तुला खूप चांगलं वाटेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी अभिषेकला पत्नी आणि मुलीसोबत कुठेतरी फिरून येण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याला सोलो ट्रिपला जाण्याचा पर्याय सुचवला आहे.

अभिषेक बच्चनची ही पोस्ट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतंय. अनेकांनी त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. कारण अभिषेक सहसा असं काही सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. तो बहुतेकदा सोशल मीडियावर त्याच्या प्रोजेक्ट्सचं प्रमोशन करताना दिसतो. त्याचं वैयक्तिक आयुष्य तो सोशल मीडियापासून दूरच ठेवणं पसंत करतो. अशा परिस्थितीत अभिषेकच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.