
दाक्षिणात्य अभिनेता बालाची पूर्व पत्नी एलिजाबेथ उदयनने रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिने बालावर फसवणुकीचा आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिला जर काही झालं तर त्यासाठी बालाच जबाबदार असेल, असंही तिने म्हटलंय. एलिजाबेथचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. “या देशात फक्त श्रीमंत लोकांनाच न्याय मिळतो का? मला मरण्याआधी न्याय मिळू शकेल का?”, असा सवाल तिने हतबल होऊन केला आहे.
या व्हिडीओमध्ये एलिजाबेथ म्हणाली, “मी नाईलाजाने अशा परिस्थितीत व्हिडीओ पोस्ट करत आहे. कारण गोष्टी आता सहनशक्तीपलीकडे गेल्या आहेत. मला धमकीचे व्हिडीओ पाठवले जात आहेत. माझ्याविरोधात खटले दाखल केले जात आहेत. तुझ्या कुटुंबीयांचं संरक्षण कर, अशी धमकी मला मिळाली आहे. इतकंच नव्हे तर मी रक्त शोषणारा कीडा आहे, असंही म्हटलं गेलंय. बाला म्हणतोय की माझं त्याच्याशी लग्नच झालं नव्हतं, कोणताच लग्नसोहळा झाला नव्हता. त्याच्याबद्दल मी खोट्या कहाण्या पसरवतेय, असं तो म्हणतोय. परंतु त्याने पत्नी म्हणूनच माझी ओळख लोकांसमोर करून दिली होती. माझ्यासोबत त्याने अनेक मुलाखती दिल्या आहेत, शोज केले आहेत. जर मला काहीही झालं, तर त्यासाठी बालाच जबाबदार असेल.”
“पोलीस माझी तक्रार स्वीकारत नाहीयेत. याप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर माझी तक्रार डीवायएसपी ऑफिसला पाठवण्यात आली. ते एकदा चौकशीसाठी माझ्या घरी आले होते. परंतु त्यानंतर पुढे कसलीच माहिती मिळाली नाही. कोर्टात केस सुरू आहे. अनेकदा बाला आणि त्याचे वकील कोर्टात हजर नव्हते”, अशा शब्दांत तिने दु:ख व्यक्त केलंय.
अभिनेता बालाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याने चार लग्न केले आहेत. 2008 मध्ये त्याने चंदना सदाशिवशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने अमृता सुरेशशी दुसरं लग्न केलं होतं. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले होते. एलिजाबेथ ही त्याची तिसरी पत्नी असल्याचं म्हटलं जातं. 2021 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्याचवर्षी बालाने कोकिलाशी चौथं लग्न केलं. बाला एक मुलाचा पिता आहे. ‘मनोरमा ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याचं फक्त दोन वेळाच लग्न झालं आहे. अभिनेत्याच्या मते, त्याची पहिली पत्नी चंदना होती आणि आता कोकिला ही दुसरी पत्नी आहे.