अभिनेते महेश कोठारे साई दरबारी; आगामी चित्रपटाच्या यशासाठी साईचरणी साकडे

प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट 'झपाटलेला ३' ('मी तात्या विंचू') च्या यशाकरिता शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच या चित्रपटात एक सरप्राइज असल्याचेही त्यांनी म्हटलं.

अभिनेते महेश कोठारे साई दरबारी; आगामी चित्रपटाच्या यशासाठी साईचरणी साकडे
| Updated on: Dec 16, 2024 | 5:54 PM

मराठी अभिनेते तथा निर्माते – दिग्दर्शक महेश कोठारे यांनी साईचरणी माथा टेकला आहे. महेश कोठारे यांनी शिर्डीला जाऊन साईंच दर्शन घेतलं आहे. यामागचं कारण मात्र नक्कीच खास आहे.

चित्रपटाचे डायलॉग आजही प्रसिद्ध

महेश कोठारे यांचे चित्रपट फारच वेगळ्या विषयांना धरून असतात. मुख्यत: त्यांचे जुने चित्रपट जास्तच लोकप्रिय आहेत. आजही लोकं त्यांचे जुने चित्रपट फार आवडीने पाहतात एवढच नाही तर त्यांच्या चित्रपटातील काही मजेशीर डायलॉग आजही लोकांच्या तोंडी असतात.

जसं की, महेश कोठारेंचा आवडता शब्द जो की तो प्रचंड व्हायरल झाला आणि नंतर तो त्यांची ओळख बनला तो शब्द म्हणजे, ‘डमिट’ , त्यानंतर झपाटलेला चित्रपटातील तात्या विंचू आणि ‘ओम फट्ट स्वाहा!’ हा डायलॉग दोन्हीही खूप गाजले.

झपाटलेल्याच्या तिसरा भाग लवकरच

मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेल्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाने तीन दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून आता त्याचा तिसरा भागही प्रदर्शित होणार आहे. झपाटलेल्याच्या तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव ‘मी तात्या विंचू’ असं असणार आहे.

तिसऱ्या भागात चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे?

महेश कोठारे यांनी जेव्हा ‘झपाटलेला 2’ हा चित्रपट आणला तेव्हा त्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांनी हिरमोड झाल्याची भावना देखील व्यक्त केली होती.

आता ‘झपाटलेला 3’मध्ये कोण दिसणार? अशी उत्सुकता असतानाच ‘मी तात्या विंचू’ हा चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे असेल असं म्हणत ते कसं काय हे एक सरप्राइज असल्याचं महेश कोठारेंनी म्हटलं आहे. झपाटलेलाचा हाच तिसरा भाग हीट व्हावा यासाठी महेश कोठारेंनी साईचरणी साकडे घातले आहे. तसेच त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत समाधीचे दर्शन घेतले.

महेश कोठारेंनी साईचरणी केलेली विनंती फळतेय का हे आता चित्रपट रिलीज झाल्यावरच समोर येईल. दरम्यान महेश कोठारे यांच्या साई दर्शनाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.