
अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची लेक, अभिनेत्री ईशा देओल सध्या फारशी दिसत नाही. काही काळापूर्वी ती आणि भरत तख्तानी हे दोघे विभक्त झाले. त्यांच्यात सर्व काही आलेबल नसल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होत्या, अखेर त्या दोघांनी एक ऑफिशिअल स्टेटमेंट देत आपण वेगळं होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ईशा तिच्या दोन मुलींसह रहात असून एकटीने त्यांचा सांभाळ करत आहे. काही दिवसांपूर्वी ईशा आणि तिचा माजी पती भरत हे दोघे सोबत दिसल्याने त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं होतं. मात्र आता भरत तख्तानीने एक पोस्ट केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ईशाचा पूर्व पती भरत हा पुन्हा प्रेमात पडला असून सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्याने प्रेमाची कबुली दिली आहै. बिझेनसमन भरत तख्तानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका तरूणीसोबत फोटो टाकला असून सध्या सर्वत्र त्याच मिस्ट्री गर्लची चर्चा सुरू आहे.
भरतच्या आयुष्यात पुन्हा आलं प्रेम ?
भरत तख्तानीने ज्या मिस्ट्री गर्लसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे तिचे नाव मेघना लखानी असल्याचे समजते. त्याने शेअर केलेल्या फोटोत भरत हा मेघनाला मिठी मारत तिच्या डोळ्यांत हरवून गेल्याचे दिसत आहे. “कुटुंबात तुझं स्वागत आहे, its official. ” असा मेसेजही त्याने या फोटोसबत पोस्ट केला आहे.
एवढंच नव्हे तर मेघना लखानी हिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही स्टोरी रि-शेअर केली आहे. त्याचसोबत तिने भरतसह आणखी एक फोटोही टाकला आहे, दोघेही एकमेकांसोबतच खूप खुश दिसत आहेत.
भरत -ईशाच्या पॅचअपची चर्चा
भरतने एका मुलीसोबत रोमँटिक फोटो शेअर केल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं, अनेकांच्या भुवया उंचावल्याय. कारण अलीकडेच ईशा आणि भरत हे दोघे परमार्थ निकेतनमध्ये सार्वजनिकरित्या एकत्र दिसले होते, तिथे त्यांनी आध्यात्मिक गुरू स्वामी चिदानंद सरस्वती यांच्यासोबत गंगा आरतीमध्ये भाग घेतला होता. या सहलीच्या फोटोंमध्ये, हे माजी जोडपं एकत्र धार्मिक विधी करताना दिसले. त्यानंतर दोघांमध्ये पॅचअप झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागले. गेल्या वर्षी घटस्फोटाची पुष्टी झाल्यानंतर हे दोघे यावेली पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. त्यामुळे ते पुन्हा एकत्र येणार का याबद्दल चर्चांना उधाण आलं. मात्र आता भरत दुसऱ्या तरूणीसोबत रोमँटिक फोटो पोस्ट केल्याने सर्व अफवाना, चर्चांन पूर्णविराम मिळाला आहे.
ईशा-भरत यांचा घटस्फोट
अभिनेत्री ईशा देओलने 2012 साली उद्योगपती भरत तख्तानीशी लग्न केले. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर, म्हणजेच 2024 मध्ये, या जोडप्याने विभक्त होण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की विभक्त होण्याच्या निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला आहे. “आम्ही परस्पर समंती आणि सौहार्दपूर्णपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या आयुष्यातील या बदलादरम्यान, , आमच्या दोन्ही मुलांचे सर्वोत्तम हित आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि राहील. आमच्या गोपनीयतेचा आदर केला जावा अशी आमची इच्छा आहे.” असे त्यांनी स्टेटमेंटमध्ये नमूद केले होते. ईशा आणि भरत यांना दोन मुली असून राध्या आणि मिराया अशी त्यांची नावं आहेत.