
माय-लेकीचं नातं खूप वेगळं असतं. कधी-कधी शिस्त लावणारी, कठोर आई आवडेनाशी होते, पण कधी-कधी मनातलं गुपित तिच्याशी शेअर केल्याशिवाय चैनही पडत नाही. आई ही प्रत्येकाचा, विशेषत: मुलींचा तर हळवा कोपरा असतो, मोठा झाल्यावर,सासरी गेल्यावर , आपण आई झाल्यावर आपल्या आईची आठवण दाटून येतेच, तेव्हा तिच्या प्रत्येक कृतीचे अर्थ लक्षात येतात. नॅशनल क्रश झाल्यामुळे रातोरात सगळ्या फीड्सवर दिसू लागलेली अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) हिने काही दिवसांपूर्वी , तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघींचे खास फोटो शेअर केले होते. आईसाठी 5 टक्के जरी झाले, तरी मी जिंकले, अशी कॅप्शन लिहीत तिने आईला शुभेच्छा दिल्या होत्या.त्याच गिरीजा ओकची आता एक मुलाखत आणि त्यातले , तिचे तिच्या आईबद्दलचे विचार, कौतुक सांगणारा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होतोय.
गिरीजा लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. काही वर्षांनी तिच्या आईनेही दुसरं लग्न केलं. ‘दिल के करीब’ या कार्यक्रमात गिरीजाने तिच्या आईचा निर्णय, त्याबद्दल वाटलेलं कौतुक , लग्नात साक्षीदार म्हणून केलेली सही याबद्दल भरभरून सांगितलं. मात्र कधीकधी आई माझ्यासोबत का नाही असा विचारही मनात यायचा हेही तिने प्रांजळपणे कबूल केलं आहे.
तेव्हा आईची फार आठवण यायची..
‘आई मी हे तुला कधीच बोलले नाहीये,पण आता या निमित्ताने सांगते. मी खूप काम करू लागले, लग्नाआधी आणि लग्नानंतरही मी कामानिमित्त एकटी रहायचे. या इंडस्ट्रीत सलग १०-१२ तास आपल्याला काम करावं लागतं, सगळ्यांना माहीत आहे हे. माझं लग्न झाल्यावर मी आणि नवरा एकत्र रहायचो, पण तोही कामानिमित्त बाहेर असायचा, कधी मी बाहेर जायचे.कबीरच्या जन्मानंतर सुद्धा जेव्हा मी कामानिमित्त मुंबईला राहायला यायचे…तेव्हा मी एकटी असायचे. आपल्या शिफ्ट अनेकदा 12 तासांच्या असतात. जाऊन-येऊन,प्रवासाचा वेळ पकडला तरी कधीकधी 16 तासांचाही दिवस होतो. दिवसभर शूटिंग नंतर प्रवास करून घरी आल्यावर आता घरी कोणीच नसणं हे मला आवडायचं नाही’ असं तिने प्रांजळपणे कबूल केलं.
आणि माझ्या घरातले सगळे याच क्षेत्रा असल्याने सगळेच तसेच बिझी असायचे. कोणाच्या घरी यायच्या वेळा ठरलेल्या नसायच्या. त्यामुळे मला कधीतरी खूप असं वाटायचं की, आता जर आई माझ्याबरोबर असती, तर एकदा तरी मला गरम जेवण मिळालं असतं. कुणीतरी माझ्यासाठी दार उघडलं असतं. मला तेव्हा खरंच तिची फार आठवण यायची असं गिरीजाने सांगितलं.
माझी आई माझ्या जवळ का नाही ?
आईने दुसर लग्न केलं त्याचा मला आनंदच होता. आता कशाला करायचं, मी पडून राहते एका कोपऱ्याता असा विचार तिने केला नाही. त्या वयात तिने तिच्यासाठी तो निर्णय घेतला, तिने तिच सुख निवडलं, घडवलं ..ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप कौतुक वाटायचं की तिने तिचं आयुष्य पुन्हा उभं केलं आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा, असं गिरीजाने सांगितलं. मी तिच्या लग्नात साक्षीदार म्हणून सही देखील केली होती. मला खूप आनंद व्हायचा. पण कधीतरी माझ्या मनात ही गोष्ट यायची की का ? माझी आई माझ्याजवळ का नाही ? असं वाटायचं, अशा शब्दांत गिरीजाने तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलली. पहिल्यांदाच ती या विषयावर व्यक्त झालेली दिसली. तिचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.