अभिनेत्रीचं बँक खातं पाहून पोलिसांची उडाली झोप; गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक अपडेट

मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को इथं कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करताना अंधेरीतल्या बारमध्ये डान्स करणाऱ्या जिया जेकबची यात महत्त्वाची भूमिका असल्याचं आढळून आलं आहे.

अभिनेत्रीचं बँक खातं पाहून पोलिसांची उडाली झोप; गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक अपडेट
जिया जेकब (Photo: X/AI Image)
Image Credit source: (Photo: X/AI Image)
| Updated on: Apr 27, 2026 | 1:20 PM

मुंबईतील अंधेरीतल्या एका प्रसिद्ध बारमध्ये डान्स करणाऱ्या 33 वर्षीय जिया जेकब ऊर्फ जिया रेचलची प्रचंड क्रेझ होती. पाच वर्षांपूर्वी बारबाला म्हणून तिचाच बोलबोला होता. ज्या बारमध्ये जिया डान्स करायची, तिथे तिच्या सौंदर्य आणि अदाकारीमुळे तिला मॉडेल-डान्सर म्हटलं जायचं. जियाचा डान्स बघण्यासाठी या बारमध्ये खूप दुरूनही लोक यायचे. परंतु 2020 मध्ये या बारच्या संचालकांवर बार डान्सर्सकडून अश्लील डान्स करून घेतल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर ओशिवरा पोलिसांच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी जियासह पाच बारगर्ल्सना अटक केली होती. परंतु नंतर त्या सर्वांची जामिनावर सुटका झाली. बारमध्ये टॉप डान्सर म्हणून गणल्या जाणाऱ्या जियाने नंतर अभिनेत्री बनण्याचं ठरवलं.

बार डान्सर ते अभिनेत्री

बार डान्सर म्हणून काम करताना जियाची ओळख अनेक धनाढ्य ग्राहकांशी झाली होती. त्यापैकी काहीजण फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित होते. याच कनेक्शनचा फायदा उचलून जियाने काही कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु तिला त्यातून फारसं यश मिळालं नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर जियाला रिहॅब सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिथून परतल्यानंतर तिने ग्लॅमर विश्वालाही रामराम केला.

मार्कशी अफेअर अन् बँक खातं

बारमध्ये काम करताना जियाची मैत्री मार्क ऊर्फ महेश खेमलानीशी झाली होती. मार्कचं सतत परदेशात जाणं-येणं असायचं आणि तिथे जियासुद्धा त्याच्यासोबत जायची. दोन वर्षांपर्यंत हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. परंतु मार्कने जियाशी लग्न केलं की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. जियाचा मीरा रोड इथला फ्लॅट आणि तिथला संपूर्ण खर्च मार्कच उचलायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. मार्कचा स्वत:पेक्षा जास्त विश्वास जियावर होता. याचे पुरावे वनराई पोलिसांनाही मिळाले आहेत. कारण वनराई पोलिसांनी जेव्हा जियाच्या बँक खात्यांची चौकशी केली, तेव्हा त्यात 50 लाख रुपयांचे ट्रान्सॅक्शन्स आढळले. आश्चर्याची बाब म्हणजे गोरेगावमधल्या नेस्को इथल्या ड्रग्ज प्रकरणानंतर तिच्या खात्यात शून्य रक्कम होती.

बँक खात्यात दडलंय रहस्य

जियाच्या खात्यातील सर्व पैसे दुसऱ्या खात्यात पाठवले गेले आहेत किंवा बिटकॉइनमध्ये त्याचं रुपांतर केल्याची शंका पोलिसांना आहे. याच खात्यात नेस्को ड्रग्ज प्रकरणात ड्रग्जचा पुरवठा केल्याचा आरोप असलेले आयुष साहित्य, शुभ अग्रवाल, विनित गेरलानी आणि आनंद पटेल रक्कम जमा करत होते. जियाने मार्कच्या माध्यमातूनच ड्रग्जच्या व्यापारात उतरल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. म्हणूनच जियाकडे याच्याशी संबंधित लोकांबद्दल बरीच माहिती आहे. जियाच्या बँक खात्याशी संबंधित अनेक ड्रग्ज विक्रेत्यांसोबतच्या संबंधांची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. तर दुसरीकडे मार्क परदेशात फरार आहे. वनराई पोलिसांनी जियाच्या भावाला चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. जिया पोलीस कोठडीत असून इतर 10 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Follow Us