
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येच्या बातमीने एकच खळबळ माजली. आज सकाळीच आलेल्या या वृत्ताने सर्वत्र हळहल व्यक्त होत आहे. अतिशय प्रतिभावान, गुणी कला दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या नितीन देसाई यांनी आज पहाटे कर्जतच्या एन.डी. स्टुडिओमध्ये आयुष्य संपवलं, अशी माहिती समोर आली आहे. मात्र त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, त्यांना काय चिंता सतावत होती याबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त होत असून काहीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान नितीन देसाई यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीतून समोर येत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृणाल कुलकर्णी यांनी एका पोस्टद्वारे नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठा धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले.
काय आहे मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट ?
दादांचं आणि माझं नातं या फोटोमध्ये दिसतंय अगदी तसंच होतं !त्यांनी निर्माण केलेल्या ” राजा शिवछत्रपती”मध्ये जिजाबाई साहेबांची भूमिका पहिल्यांदा केली आणि त्यानंतर ” रमा माधव” च्या दिग्दर्शनाच्या वेळेला ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अतिशय गुणी असा मनस्वी कलावंत , कोणत्याही संकटात न डगमगणारा माणूस.. फार मोठा धक्का ..’ अशा शब्दांत मृणाल कुलकर्णी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
दरम्यान अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेत्री किशोरी शहाणे, दिग्दर्शक महेश कोठारे, महेश मांजरेकर, प्रवीण तरडे यांनीही नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ त्यांचं असं कोणाशी काहीच न बोलता जाणं खूप क्लेशकारक आहे’, अशा शब्दांत आदेश बांदेकर यांनी भावना व्यक्त केल्या.
नितीन देसाई यांनी २० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केलं. 1993 साली आलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या ‘1942 अ लव स्टोरी’ या चित्रपटाच्या सेटमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘खाकी’ अशा चित्रपटांसाठीही त्यांनी भव्य दिव्य सेट डिझाईन केले. त्यानी आत्तापर्यंत 178 हून सेट डिझाइन केले. अत्यंत गुणी अशा या कलाकाराने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.