Neha Joshi: अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात; महिला पुरोहितांनी पार पाडल्या विधी

| Updated on: Aug 19, 2022 | 11:11 AM

नेहाला साधेपणानेच लग्न करायचं होतं आणि त्यानुसारच तिने लग्न केलं. पारंपारि‍क विधींनंतर कोर्टात विवाह आणि दुस-या दिवशी छोटेखानी रिसेप्‍शन ठेवण्‍यात आलं.

Neha Joshi: अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात; महिला पुरोहितांनी पार पाडल्या विधी
Neha Joshi: अभिनेत्री नेहा जोशी अडकली विवाहबंधनात
Image Credit source: Instagram
Follow us on

एण्‍ड टीव्‍हीवरील आगामी कौटुंबिक मालिका ‘दुसरी माँ’मध्‍ये यशोदाची भूमिका साकारणारी लोकप्रिय रंगभूमी आणि टेलिव्हिजन अभिनेत्री नेहा जोशी (Neha Joshi) नुकतीच विवाहबंधनात (Wedding) अडकली. नेहाने प्रियकर ओमकार कुलकर्णीशी (Omkar Kulkarni) लग्न केलं. 16 ऑगस्‍ट 2022 रोजी मुंबईत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्‍या उपस्थित हा विवाह संपन्‍न झाला. नेहाला साधेपणानेच लग्न करायचं होतं आणि त्यानुसारच तिने लग्न केलं. पारंपारि‍क विधींनंतर कोर्टात विवाह आणि दुस-या दिवशी छोटेखानी रिसेप्‍शन ठेवण्‍यात आलं. नेहाने लग्नात सोनेरी जर असलेली निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. तर रिसेप्शनसाठी एका डिझायनर मित्राने भेट दिलेली साडी तिने नेसली. दुसऱ्या दिवशी कोर्ट मॅरेजसाठी तिने सलवार कमीज निवडला. नेहाच्या लग्नाची खास गोष्ट म्हणजे तिच्या लग्नाची विधी दोन महिला पुरोहितांनी पार पाडली.

लग्नाबद्दल नेहा जोशी म्‍हणाली, ”माझी मोठ्या जल्‍लोषात विवाह करण्‍याची कधीच इच्‍छा नव्‍हती आणि मी नेहमीच गोष्‍टी साध्‍यासोप्‍या ठेवण्‍याला पसंती दिली आहे. हा विवाह कमी जल्लोषात करण्‍यात आला, पारंपारि‍क विधींनंतर कोर्टात विवाह आणि दुसऱ्या दिवशी लहानसं रिसेप्‍शन ठेवण्‍यात आलं. माझ्यासाठी विवाह व समारंभ हे अधिककरून कौटुंबिक सोहळ्यासारखे आहेत आणि मी त्‍यांना खासगी ठेवणं पसंत करते. माझ्या विवाहाचा सर्वात चांगला भाग म्हणजे हा विवाह दोन महिला पुरोहितांनी केला, ज्यांनी आम्हाला विधींचा इतिहास आणि महत्त्व समजावून सांगितलं. ते खूपच सुंदर होते.”

हे सुद्धा वाचा

पती आणि अभिनेता, दिग्‍दर्शक, लेखक ओमकार कुलकर्णीबाबत सांगताना नेहा पुढे म्‍हणाली, ”मला आठवतंय की, दहा वर्षांपूर्वी एका मराठी मालिकेच्‍या सेटवर मी त्‍याला भेटले आणि आमच्‍यामध्‍ये लगेच मैत्री झाली. अनेक वर्षे एकमेकांना जाणून घेण्‍यासोबत जिवलग मित्र बनल्‍यानंतर आमच्‍यामध्‍ये प्रेम बहरलं. आम्‍हा दोघांना आमच्‍या कलेप्रती समान प्रेम आणि आवड आहे आणि माझ्या मते याच गोष्‍टीने आम्‍हाला जवळ आणलं. आम्‍ही सर्व गोष्‍टी धिम्‍या गतीने करण्‍याचं ठरवलं आणि लिव्ह-इन रिलेशनशीपमध्‍ये राहिलो. एकत्र हा प्रवास अद्भुत राहिला आहे आणि आता आमचा विवाह झाला असला तरी आम्‍हाला पेपरवर आमच्‍या नात्‍याला अधिकृत रूप देत असल्‍यासारखं वाटतं. आम्‍हाला विवाह करावा असं कधीच वाटलं नाही, कारण आमच्‍यामधील एकमेकांप्रती प्रेम, आदर व आपुलकी आमच्‍या नात्‍यापेक्षा अधिक होतं. याव्‍यतिरिक्‍त आम्‍ही पूर्णत: आमच्‍या करिअरवर लक्ष केंद्रित केलं, ज्‍यामुळे आम्‍ही व्‍यस्‍त राहिलो.”