Rekha : मी त्यांचा संसार मोडायला…अमिताभ बच्चन यांच्याबद्दल रेखा यांनी केलेलं बेधडक वक्तव्य
Rekha On Amitabh Bachchan : रेखा यांनी एका जुन्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बेधडक वक्तव्य केलेलं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रेखा यांनी खूप लहान वयातच अभिनयाच्या जगात प्रवेश केला. रेखा त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. त्यांच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या. एका जुन्या मुलाखतीत रेखा यांनी अमिताभ यांच्याबद्दल भाष्य केलेलं. रेखा आणि अमिताभ यांची १९७३ मध्ये ‘नमक हराम’च्या सेटवर भेट झाली होती, परंतु त्यांनी १९७६ मध्ये ‘दो अनजाने’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं.
यामुळे सर्वांना वाटलं की, ‘दो अनजाने’च्या सेटवर त्यांच्यात मतभेद होतील, पण झालं मात्र याच्या उलट. जेव्हा रेखा यांनी बिग बींसोबत काम केलं, तेव्हा त्या अमिताभ यांचं काम बघून थक्क झाल्या. सिमी गरेवालला २००४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभं राहणं सोपं नाही. मी यापूर्वी त्यांच्यासारख्या व्यक्तीला कधीही भेटले नाही. एका व्यक्तीमध्ये इतके गुण कसे असू शकतात? मी असं कधी पाहिलं नाही.’
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाल्या रेखा?
रेखा आणि अमिताभ बच्चन अभिनीत १९७६ चा ‘दो अनजाने’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. पण, रेखा यांना या चित्रपटातून अपेक्षित असलेला आदर मिळाला. या आदराचं संपूर्ण श्रेय त्यांनी अमिताभ यांना दिलं. त्यांनी एका मुलाखतीत उघडपणे सांगितलं की, बिग बी विवाहित आहेत की नाही याची त्यांना पर्वा नाही.
एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती, ‘ते विवाहित आहेत याने मला काही फरक पडत नाही. गुलाब म्हणजे गुलाबच…मी त्यांचा संसार मोडायला आलेली नाही. मी फक्त त्या सामान्य लोकांपैकी एक होण्यासाठी आले आहे, जे केवळ त्यांच्या सुगंधानेच आनंदी होतात.’
१९७० मध्ये, मासिकांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. बिग बींचा थेट नावानं उल्लेख करण्याऐवजी, मासिकांनी त्यांच्या वृत्तांत त्यांना ‘सुपरस्टार’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.
एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, रेखा यांनी आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा मी कोणावर प्रेम करते, तेव्हा मी ते मनापासून करते. मी प्रत्येक मिनिटाला त्यांचाच विचार करते. ते दिवसाचे २४ तास माझ्या मनात असतात. जर त्यांनी मला फोन करण्याचं वचन दिलं आणि ते पाळलं नाही, तर मला खूप राग येतो.’
रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा ‘सिलसिला‘ हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही चाहते हा सिनेमा आवर्जून बघतात.