Varsha Dandale : नामांकित अभिनेत्रीच्या पर्सनल रूममध्ये साडी बदलली म्हणून मला…मराठी अभिनेत्रीनं सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव
Varsha Dandale : अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हिंदी मालिकेचा अनुभव सांगितला आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या काळात त्यांना काही कटू अनुभवांचाही सामना करावा लागला. असाच एक प्रसंग त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. हिंदीतील लोकप्रिय ‘चाचा चौधरी’ या मालिकेच्या सेटवर त्यांच्यासोबत अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती.
वर्षा दांदळे यांनी सांगितला प्रसंग
वर्षा दांदळे यांनी करिअरच्या सुरुवातीला अनेकदा मॉब आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. त्याच काळात त्यांना ‘चाचा चौधरी’ या हिंदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, या मालिकेच्या सेटवर त्यांना आलेला अनुभव आजही त्यांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे, या प्रसंगाच्या आदल्या दिवशीच त्यांनी एका मराठी मालिकेत दमदार अभिनय केला होता. याबद्दल सांगताना वर्षा दांदळे म्हणाल्या की, ‘सह्याद्री वाहिनीवरील फिर्याद या मालिकेत मला एका दिवसासाठी काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये मुलाचा खून झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या मुलासाठी न्याय मागणाऱ्या आईची भूमिका मी साकारली होती. अशा भावनिक भूमिका मिळाल्या की, मी माझा जीव ओतून अभिनय करते. त्या दिवशी माझा अभिनय पाहून सेटवर टाळ्याही वाजवण्यात आल्या होत्या.’
आदल्या दिवशी मिळालेल्या कौतुकामुळे आनंदात असलेल्या वर्षा दुसऱ्या दिवशी ‘चाचा चौधरी’च्या सेटवर पोहोचल्या. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांना सुरुवातीलाच बाहेर बसवण्यात आलं. त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा हवी होती. त्यामुळे त्यांनी सेटवरील एका व्यक्तीकडे विचारणा केली. त्याने त्यांना एका खोलीत जाण्यास सांगितलं. वर्षा त्या खोलीत साडी बदलत असताना अचानक दरवाजा वाजवण्यात आला. आपण कपडे बदलत असल्याचं त्यांनी दरवाजाबाहेरील व्यक्तीला सांगितलं. मात्र, पुन्हा दरवाजा वाजवण्यात आल्यानं त्यांचा आवाज चढला. आदल्या दिवशीच्या कौतुकामुळे थोडा आत्मविश्वासही वाढला होता. त्यामुळे त्यांनी मोठ्या आवाजात ‘चेंजिंग’ असं सांगितलं.
साडी बदलून झाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी समोर ‘चाचा चौधरी’च्या पत्नीची भूमिका साकारणारी एक ज्येष्ठ अभिनेत्री उभी होती. ती अभिनेत्री रागानं आपल्याकडे पाहत असल्याचं वर्षा यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला तिला नेमका राग कशाचा आला आहे, हे त्यांना समजलं नाही. मात्र, नंतर त्यांना कळलं की, ती खोली त्या अभिनेत्रीची पर्सनल मेकअप रूम होती. वर्षा यांना मात्र ती सर्व महिला कलाकारांसाठी कपडे बदलण्याची खोली असल्याचं वाटलं होतं. या नंतर वर्षा यांना सेटवर वेगळीच वागणूक दिली गेली. त्यांना दिवसभर मॉब आर्टिस्ट म्हणूनही उभं करण्यात आलं नाही. उलट दिवसभर त्यांना झाडाखाली बसवून ठेवण्यात आलं. आपला सीन कधी शूट होणार, याची त्या वाट पाहत होत्या. प्रोडक्शन टीममधील लोकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडून ‘आयेगा, आयेगा’ असंच उत्तर मिळत होतं.
अखेर रात्री नऊ वाजता पॅकअप झालं. त्यावेळी आपला सीन शूट का केला नाही, अशी विचारणा वर्षा यांनी केली. त्यावर शूटिंग संपलं असून आपले पैसे घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. त्या काळात कलाकारांना रोख पैसे दिले जात असत. त्यामुळे पैसे घेऊन वर्षा तिथून निघाल्या. मात्र, दिवसभर आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे त्यांना तेव्हा समजलं नव्हतं. पुढे अभिनय क्षेत्रात अनुभव वाढल्यानंतर त्यांना या प्रसंगामागचं कारण समजलं. संबंधित अभिनेत्रीच्या वैयक्तिक मेकअप रूममध्ये आपण साडी बदलली आणि त्यावेळी मोठ्या आवाजात बोलल्यामुळे तिचा अहंकार दुखावला गेला असावा, असं वर्षा यांच्या लक्षात आलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अनुभव सांगितला.
