
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका अभिनेत्रीच्या घरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तिच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तिचा एक मुलगा इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून काम करत होता. ही घटना रात्री २च्या सुमारास घडली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
कोटामध्ये, शनिवारी रात्री उशिरा 2 वाजता एका फ्लॅटमध्ये आग लागल्याने दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून धूर निघताना पाहिला. त्यांनी तातडीने दरवाजा तोडला, मुलांना बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृत मुलांपैकी थोरला मुलगा, शौर्य (15), एका खासगी कोचिंग सेंटरमधून आयआयटीची तयारी करत होता, तर धाकटा मुलगा, वीर, याने मालिका आणि राजस्थानी गीतांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. वीर हा बालकलाकार म्हणूनही ओळखला जात होता.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
ही घटना पाथर मंडी परिसरातील दीप श्री मल्टिस्टोरी बिल्डिंगमध्ये घडली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 403 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही वेळातच धूर संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरला. यावेळी घरात झोपलेल्या दोन निरागस भावांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोक पसरला आहे.
वडील खासगी कोचिंगमध्ये शिक्षक
मुलांचे वडील, जितेंद्र शर्मा, कोटातील एका खासगी कोचिंग संस्थेत शिक्षक आहेत. त्यांची आई, रीता शर्मा, मूळची अभिनेत्री आहे. तिने मिस बल्गेरिया हा किताबही जिंकला आहे. ती सध्या मुंबईत टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत होती. अपघाताच्या वेळी मुलांचे आई- वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मुले घरी एकटीच होती. स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की ही घटना बहु-कुटुंबीय फ्लॅटच्या चौथ्या मजल्यावर घडली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
वीर आणि शौर्यचा मृतदेह एका मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या पोलीस घटनास्थळी असून चौकशी करत आहेत. मुलांच्या निधनानंतर वडिलांनी डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.