Adinath Kothare : रणबीर आणि मी एकाच…कपूर आणि कोठारे कुटुंबाचा खास योगायोग; आदिनाथ कोठारेचा खुलासा
Adinath Kothare On Ranbir Kapoor : आदिनाथ कोठारेनं एका मुलाखतीत रणबीर कपूरसोबतच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत.

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो भरताची भूमिका साकारत असून, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, रणबीर आणि आदिनाथ यांची ओळख या चित्रपटाच्या निमित्तानं झालेली नाही. या दोघांमध्ये बालपणापासूनच मैत्रीचे नातं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आदिनाथनं रणबीरसोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आदिनाथने सांगितलं की, तो आणि रणबीर एकाच शाळेत शिकत होते. रणबीर त्याच्यापेक्षा शाळेत सिनियर होता. विशेष म्हणजे दोघंही एकाच इमारतीत राहत असल्यानं त्यांची नेहमी भेट व्हायची. त्यांचा एक कॉमन मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक विनय गांधी याच्यामार्फत दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर अनेकदा ते एकत्र क्रिकेट खेळायचे. त्या काळातील आठवणी सांगताना आदिनाथनंरणबीरच्या लहानपणीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगितलं. त्यावेळी रणबीर खूप उंच आणि बारीक होता, अशी आठवण त्यानं सांगितली. आज दोघेही मनोरंजनविश्वात आपापली वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
कपूर आणि कोठारे कुटुंबांमधील खास योगायोग
आदिनाथनं यावेळी कपूर आणि कोठारे कुटुंबांमधील एक रंजक योगायोगही सांगितला. आदिनाथचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून काम करताना ‘घर घर की कहानी’ या मालिकेत अभिनेत्री नीतू सिंह यांच्या भावाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर आता आदिनाथ स्वतः ‘रामायण’ चित्रपटात नीतू सिंह यांचा मुलगा रणबीर कपूर याच्या भावाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे, तर आदिनाथ भरताची भूमिका साकारत आहे. त्यामुळे दोन पिढ्यांमधील हा योगायोग विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
अशी मिळाली ‘रामायण’मध्ये भरताची भूमिका
दरम्यान, आदिनाथने यापूर्वी एका मुलाखतीत ‘रामायण’मधील भूमिकेसाठी झालेल्या निवडीचा किस्साही सांगितला होता. सुरुवातीला त्यानं कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राच्या कार्यालयात लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. मात्र, त्याचं आधीचं काम आणि ऑडिशनमधील अभिनय पाहून दिग्दर्शक नितेश तिवारी प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी आदिनाथची भरताच्या भूमिकेसाठी निवड केली. ‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटाचा भाग होता येणं हा आपल्यासाठी आशीर्वाद असल्याचंही आदिनाथनं म्हटलं आहे. नितेश तिवारी आणि मुकेश छाब्रा यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यानं कृतज्ञता व्यक्त केली.