“या मूर्ख अडाण्याला..”; पाकिस्तानच्या पूर्व मंत्र्यावर का भडकला अदनान सामी?

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या एका पूर्व मंत्र्याने गायक अदनान सामीविषयी सवाल केला.

या मूर्ख अडाण्याला..; पाकिस्तानच्या पूर्व मंत्र्यावर का भडकला अदनान सामी?
गायक अदनान सामी
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 27, 2025 | 9:57 AM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एका पत्रकाराने केंद्र सरकारच्या या निर्णयाविषयी पोस्ट लिहिली होती. त्यावर पाकिस्तानचे माजी माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी गायक अदनान सामीचा उल्लेख करत त्याच्या राष्ट्रीयत्वावरून सवाल उपस्थित केला होता. फवाद यांच्या या पोस्टवर आता खुद्द अदनान सामीने उत्तर दिलं आहे.

भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ देश सोडून जाण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आल्यानंतर फवाद चौधरी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलं, ‘अदनान सामीबद्दल काय?’ त्या ट्विटर खुद्द अदनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘या अडाणी मूर्ख व्यक्तीला कोण सांगणार?’ असं ट्विट त्याने केलंय. गायक अदनान सामीला डिसेंबर 2015 मध्ये भारताचं नागरिकत्व मिळालं होतं. अदनानचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून त्याचे आई-वडील पाकिस्तानी आहेत. अदनानचं शिक्षणसुद्धा परदेशातच पूर्ण झालं होतं.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा अदनान सामीनेही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता.

दरम्यान व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे असून त्यांना परत पाठवण्याचा तयारी पोलिसांनी केली आहे. माणुसकीच्या दृष्टीने उपचारांसाठी भारतात राहू देण्याचा विनंती काही पाकिस्तानी रुग्णांनी केली असली, तरी हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी कडक निर्णय घ्यावेच लागतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत करण्यात आलेल्या तपासणीत 14 पाकिस्तानी नागरिक शहरात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी नऊ जणांना शनिवारी आणि आणखी तीन जणांना रविवारी तात्काळ देश सोडून जाण्याची कागदपत्रे देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय.