गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पा शिरोडकरसोबत डान्स; बिग बॉस म्हणाला “पत्नीने केस केली तर..”

मराठा आरक्षणाविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणीमुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. बिग बॉसमध्ये त्यांचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला होता. नुकताच त्यांच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पा शिरोडकरसोबत डान्स; बिग बॉस म्हणाला पत्नीने केस केली तर..
Gunaratna Sadavarte and Shilpa Shirodkar
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 15, 2024 | 12:05 PM

‘बिग बॉस’चा अठरावा सिझन नुकताच सुरू झाला असून गेल्या काही दिवसांपासून हा शो चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच या शोमधून अॅड. गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले. हा शो सुरू झाल्यापासून त्यांनी विविध कारणांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी बिग बॉसच्या घरात रंगतदार वातावरण निर्माण केलं होतं. मात्र एका खटल्याच्या निमित्ताने त्यांना अचानक घराबाहेर पडावं लागलं. आता बिग बॉसच्या घरातील त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे सदावर्तेंचा कधीही न पाहिलेला अंदाज समोर आला आहे. यामध्ये ते चक्क नाचताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांच्यासोबत त्यांनी डान्स केला आहे.

शिल्पा शिरोडकर या माझ्या क्रश आहेत, असं सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात म्हटलं होतं. कॉलेजमध्ये असताना शिल्पा यांचे चाहते असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. आता सोमवारच्या भागात हे दोघं बॉलिवूडच्या एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसले. शिल्पा यांच्याच ‘सनम मेरे सनम’ या गाण्यावर सदावर्तेंनी ठेका धरला. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिल्पा आणि सदावर्तेंचा डान्स पाहिल्यानंतर ‘बिग बॉस’नेही त्यांची फिरकी घेतली. “तुम्हा दोघांनी खूप छान डान्स केला. मला खात्री आहे की तुमची पत्नी जयश्री यांनाही हा डान्स खूप आवडेल”, असं बिग बॉस म्हणताच घरात एकच हशा पिकतो. पुढे बिग बॉस सदावर्तेंना म्हणतो, “चुकून जयश्री यांनी शिल्पा यांच्यावर केस केली, तर तुम्हाला शिल्पा यांच्या बाजूने केस लढवावी लागेल.” त्यावर सदावर्तेही होकार देतात. अभ्यास आणि पुस्तकांच्या बाहेर येऊन मी पहिल्यांदाच अशाप्रकारचं जीवन जगतोय, अशी भावना सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात व्यक्त केली.

सदावर्ते बिग बॉसच्या घराबाहेर का पडले?

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने सदावर्ते यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “मराठा आरक्षणावरील इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसच्या घरात जाऊन बसले”, अशी माहिती वकिलांकडून हायकोर्टात देण्यात आली. यावेळी हायकोर्टाने सदावर्तेंवर ताशेरे ओढले. या याचिकेवरील सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी सदावर्ते बिग बॉसच्या घराबाहेर पडले.