Nayanthara: 7 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री नयनताराचं लग्न; OTT वर रिलीज होणार लग्नाचा Video

नयनताराचं नाव अनेकदा प्रभूदेवाशी जोडलं गेलं. प्रभूदेवाचा संसार नयनतारामुळेच मोडला असंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर प्रभूदेवाच्या प्रेमात असताना नयनताराने तिचा धर्मही बदलला होता, अशीही चर्चा आहे.

Nayanthara: 7 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री नयनताराचं लग्न; OTT वर रिलीज होणार लग्नाचा Video
Nayanthara and Vignesh Shivan
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 12:26 PM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला (Vignesh Shivan) ती गेल्या सात वर्षांपासून डेट करत असून येत्या 9 जून रोजी हे दोघं आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक गौतम मेनन या लग्नसोहळ्याचं (wedding ceremony) दिग्दर्शन एखाद्या चित्रपटाप्रमाणेच करणार आहेत. कारण नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाच्या व्हिडीओचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मला विकले जाणार आहेत. एका ओटीटी प्लॅटफॉर्मने यासाठी त्यांना मोठी रक्कम दिली असून त्यासाठीच गौतम मेनन हे लग्नसोहळ्याचं रितसर दिग्दर्शन करणार असल्याचं समजतंय. नयनतारा आणि विग्नेश यांनी नुकतीच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलंय. चेन्नईतील महाबलीपुरम इथं पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

या लग्नसोहळ्याचं प्रिव्ह्यू शूटिंग रविवारी 5 जून रोजी करण्यात आलं. एखाद्या डॉक्युमेंट्रीप्रमाणे लग्नाचा व्हिडीओ शूट करण्यात येणार आहे. या लग्नाला रजनिकांत, कमल हासन, चिरंजीवी, सूर्या, अजित, कार्ती, विजय सेतुपती, समंथा रुथ प्रभू असे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार हजर राहणार असल्याचं कळतंय.

पहा फोटो-

मार्च 2021 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांनी साखरपुडा केला. ‘मी माझं आयुष्य तुझ्या हाती सोपवतेय’ असं कॅप्शन देत नयनताराने रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. हे दोघं 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘नानुम राऊडी धान’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती.

नयनताराचं नाव अनेकदा प्रभूदेवाशी जोडलं गेलं. प्रभूदेवाचा संसार नयनतारामुळेच मोडला असंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर प्रभूदेवाच्या प्रेमात असताना नयनताराने तिचा धर्मही बदलला होता, अशीही चर्चा आहे. त्यावेळी हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नयनताराने 2003 मध्ये चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यापूर्वी ती मॉडेलिंग करायची. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये नयनताराचं नाव आवर्जून घेतलं जातं.