हिना खाननंतर या सेलिब्रिटीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, फोटो शेअर करत दिली माहिती
बॉलिवूड अभिनेत्री हिना खाननंतर आता ‘मास्टरशेफ इंडिया’ विजेत्या पंकज भदौरिया यांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; सोशल मीडियावरून दिली माहिती.

स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर हा आजच्या काळात महिलांमध्ये झपाट्याने वाढणारा गंभीर आजार ठरत आहे. सामान्य महिलांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणी या आजाराशी झुंज देताना दिसत आहेत. अभिनेत्री हिना खानच्या कॅन्सरशी सुरू असलेल्या लढाईनंतर आता आणखी एका प्रसिद्ध महिलेने स्वतःला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. ही व्यक्ती म्हणजे लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरिया.
पंकज भदौरियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आपल्या आजाराबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर रुग्णांच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. फोटोसोबत तिने लिहिले, मला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे… तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याची गरज आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून अनेकांनी सोशल मीडियावरून तिला धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तिला कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे, याबाबत तिने कोणतीही माहिती दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच दिला होता हेल्थ चेकअपचा सल्ला
विशेष म्हणजे, 17 मे 2026 रोजी पंकज भदौरियाने एक पोस्ट शेअर करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले होते. ती म्हणाली होती की, जर तुमचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर दरवर्षी फुल बॉडी चेकअप करणे आवश्यक आहे. आरोग्य म्हणजे केवळ आजारावर उपचार करणे नाही तर आजार होण्यापूर्वी त्यापासून बचाव करणेही महत्त्वाचे आहे.
तिने पुढे लिहिले होते की नियमित तपासणीमुळे अनेक आजार लवकर समजू शकतात, योग्य वेळी उपचार मिळू शकतात आणि मानसिक शांतताही मिळते. लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका, भविष्यात तुमचे आरोग्य तुम्हालाच धन्यवाद देईल असा सल्लाही तिने दिला होता.
‘मास्टरशेफ इंडिया’मुळे मिळाली ओळख
पंकज भदौरिया ही भारतातील लोकप्रिय सेलिब्रिटी शेफ, लेखिका आणि टीव्ही होस्ट म्हणून ओळखल्या जाते. तिने 2010 मध्ये MasterChef India या कुकिंग रिअॅलिटी शोच्या पहिल्या सिझनमध्ये भाग घेतला होता आणि विजेतेपद पटकावत मोठी लोकप्रियता मिळवली होती. यानंतर तिने विविध कुकिंग शो, पुस्तकं आणि यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या रेसिपी व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असते.