ऑनस्क्रीन वहिनीशी लग्न, 4 वर्षांतच पत्नीपासून विभक्त? प्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा

'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील अभिनेता नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे लग्नाच्या चार वर्षांतच विभक्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. ऐश्वर्याने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे.

ऑनस्क्रीन वहिनीशी लग्न, 4 वर्षांतच पत्नीपासून विभक्त? प्रसिद्ध जोडप्याच्या घटस्फोटाची चर्चा
Aishwarya Sharma and Neil Bhatt
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2025 | 10:51 AM

‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत भूमिका साकारून अभिनेता नील भट्ट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा घराघरात पोहोचले. या मालिकेत ऐश्वर्याने नीलच्या वहिनीची भूमिका साकारली होती. एकत्र काम करताना हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि खऱ्या आयुष्यात त्यांनी लग्नगाठ बांधली. परंतु आता लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांचा घटस्फोट होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधी त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा होत्या. परंतु ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘खोट्या बातम्या पसरवणं थांबवा’ असं स्पष्ट केलं होतं. आता गणेश चतुर्थीनिमित्त तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. यामागचं कारण म्हणजे ऐश्वर्याच्या एकही फोटोमध्ये नील दिसला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त ऐश्वर्याच्या घरात गणपतीचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. परंतु यातील कोणत्याच फोटोमध्ये नील तिच्यासोबत दिसला नाही. त्यामुळे ऐश्वर्याने गणेशोत्सव एकटीनेच साजरा केला की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तू नीलसोबत फोटो का काढत नाहीस? तो कुठे आहे’, असा सवाल एकाने केला. तर ‘खरंच तुझा आणि नीलचा घटस्फोट झाला का’, असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे.

ऐश्वर्या आणि नीलची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 30 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांनी ‘बिग बॉस 17’मध्येही एकत्र भाग घेतला होता. या शोमध्ये अनेकदा दोघांची भांडणं पहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने तिच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. तिने लिहिलं होतं, ‘मी बऱ्याच काळापासून गप्प होते. कारण मला माझी शांती जपायची होती. परंतु ज्याप्रकारे मी न बोललेल्या गोष्टीही काही जणांकडून लिहिल्या जात आहेत, मी कधीच न सांगितलेल्या कथा पसरवल्या जात आहेत आणि स्वत:च्या प्रसिद्धीसाठी तथ्य किंवा पुराव्यांशिवाय माझ्या नावाचा वापर केला जातोय.. हे पाहून मला खूप त्रास होतोय. माझ्या नावाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणं थांबवा.’