घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने सोडलं मौन; म्हणाली “मला खूप त्रास..”
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि नील यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. त्या चर्चांवर अखेर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिने टीकाकारांना सुनावलं आहे. ऐश्वर्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘गुम है किसी के प्यार’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता नील भट्टने त्याच मालिकेतील सहअभिनेत्री ऐश्वर्या शर्माशी लग्न केलं. विशेष म्हणजे ऐश्वर्याने या मालिकेत नीलच्या वहिनीची भूमिका साकारली होती. त्यामुळे मालिकेत आणि खऱ्या आयुष्यातही ही जोडी सतत चर्चेत राहिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर ऐश्वर्या आणि नील एकमेकांना घटस्फोट देत असल्याचंही म्हटलं गेलं. या चर्चांवर अखेर ऐश्वर्याने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने भलीमोठी पोस्ट लिहित अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर एखादा मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडीओ असेल तर ते समोर आणा, असंही आव्हान तिने ट्रोलर्सना दिलं आहे.
ऐश्वर्या शर्माची पोस्ट-
‘मी बऱ्याच काळापासून गप्प होते. मी कमकुवत आहे म्हणून नव्हे तर मला माझी शांती जपायची होती म्हणून मी मौन बाळगलं होतं. परंतु ज्याप्रकारे मी न बोललेल्या गोष्टीही काही जणांकडून लिहिल्या जात आहेत, मी कधीच न सांगितलेल्या कथा पसरवल्या जात आहेत आणि स्वत:च्या प्रसिद्धीसाठी तथ्य किंवा पुराव्यांशिवाय माझ्या नावाचा वापर केला जातोय.. हे पाहून मला खूप त्रास होतोय. मी हे स्पष्ट करू इच्छिते की, मी कोणत्याच मुलाखती, जबाब किंवा रेकॉर्डिंग्स दिलेल्या नाहीत. या गोष्टींचे जर तुमच्याकडे एखादा खरा पुरावा असेल, एखादा मेसेज किंवा ऑडिओ, व्हिडीओ असतील तर ते समोर आणा. माझ्या नावाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणं थांबवा’, असं तिने स्पष्ट केलंय.
या पोस्टमध्ये ऐश्वर्याने पुढे लिहिलंय, ‘माझं आयुष्य हे तुमच्या कंटेटचा विषय नाही. माझं मौन म्हणजे तुमच्यासाठी परवानगी नाही. हे लक्षात ठेवा की, एखादी व्यक्ती गप्प असेल तर त्याचा अर्थ त्यांच्याकडे बोलायला काही नाही असा होत नाही. त्याचा अर्थ असा होतो की ते गोंगाटापेक्षा आदरपूर्वक वागण्याची निवड करत आहेत.’

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांनी 30 नोव्हेंबर 2011 रोजी मध्य प्रदेशमधल्या उज्जैन इथं लग्न केलं. या दोघांची पहिली भेट ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्यानंतर या दोघांनी ‘बिग बॉस 17’मध्ये एकत्र भाग घेतला होता.
