हिंदीतल्या लॉबीबद्दल स्पष्टच बोलले अजिंक्य देव; “मला स्वीकारलं नाही..”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते अजिंक्य देव बॉलिवूड इंडस्ट्रीतील लॉबीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. हिंदी सिनेसृष्टीतल्या लॉबीने मला स्वीकारलं नाही, असं ते थेट म्हणाले. यावेळी त्यांनी अजय देवगण, अक्षय कुमार यांचा उल्लेख केला.

हिंदीतल्या लॉबीबद्दल स्पष्टच बोलले अजिंक्य देव; मला स्वीकारलं नाही..
Ajinkya Deo
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2025 | 12:29 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी हिंदीतही काम केलं आहे. परंतु हिंदीत त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. अजिंक्य देव यांना ॲक्शन हिरो बनायचं होतं. पण हिंदीतल्या लॉबीने मला आत शिरू दिलं नाही, अशी तक्रार त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली. ते लवकरच रणबीर कपूरच्या ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांनी मराठीत ‘माहेरची साडी’, ‘सर्जा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘माझं घर माझा संसार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टी आणि तिथली लॉबी यांविषयी ते या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी अक्षय कुमार, अजय देवगण यांचाही उल्लेख केला.

काय म्हणाले अजिंक्य देव?

‘कॅचअप’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव म्हणाले, “मला ॲक्शन हिरो व्हायचं होतं. त्यासाठी प्रयत्न करत मी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्याचवेळी इंडस्ट्रीत अक्षय कुमार, अजय देवगण आले. मी त्यांच्यासोबत कामसुद्धा केलंय. अक्षय कुमारसोबत मी ‘पांडव’मध्ये काम केलं होतं. मराठीतला मोठा स्टार म्हणून ते माझ्याकडे बघायचे. पण मराठी अभिनेता म्हणून मला हिंदीतल्या लॉबीने शिरू दिलं नाही. मी खूप प्रयत्न केले”

हिंदीतल्या लॉबीविषयी त्यांनी पुढे सांगितलं, “माझे वडील रमेश देव यांनी हिंदीतली लॉबी मोडून काढली होती. डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर यांनीसुद्धा ती लॉबी ब्रेक केली होती. पण माझ्यावेळी अनेक स्टारकिड्स इंडस्ट्रीत आले. अजय देवगण, सनी देओल.. असे आम्ही सर्वजण एकाच काळातले आहोत. नंतर शाहरुखचा काळ आला.”

याविषयी बोलताना त्यांनी स्वत:चीही चूक असल्याचं मान्य केलं. “कुठेतरी माझ्यातसुद्धा कमतरता असेल. मी डान्स नीट शिकायला हवा होता. हिंदीतली लॉबी मोडून काढणं मलाही कदाचित शक्य झालं असतं. पण मी एकाच कलेवर अवलंबून होतो. बाबांनी तेव्हाच निर्मिती संस्था सुरू केली होती. त्यामुळे मी त्यांच्यासोबत निर्मिती संस्थेचं काम पाहू लागलो होतो. कुठेतरी माझीही चूक असेल, माझंही दुर्लक्ष झालं असेल. पण माझ्याही वाट्याला चांगले चित्रपट आणि चांगल्या भूमिका आल्या आहेत”, असं ते म्हणाले.