
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात क्रूर रेहमान डकैतची भूमिका साकारून अभिनेता अक्षय खन्नाने सर्वांनाच थक्क केलं. या भूमिकेतील त्याचा लूक, डान्स, परफॉर्मन्स सर्वकाही दमदार होतं. सोशल मीडियावर त्याची इतकी वाहवा झाली की, अक्षय यापुढे आणखी कोणत्या नव्या अंदाजात दिसणार, हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली. ‘धुरंधर’नंतर अक्षय ‘दृश्यम 3’ या सस्पेन्स थ्रिलरमध्ये झळकणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु निर्मात्यांसोबत वाद झाल्यानंतर त्याने हा प्रोजेक्ट सोडला. त्यानंतर त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला आहे. अक्षय लवकरच ‘महाकाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिग्दर्शिक प्रशांत वर्मा यांनी सोशल मीडियावर अक्षय खन्नाचा सेटवरील हा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘एक खरा अभिनेता, जो हे सिद्ध करतो की खऱ्या प्रतिभेला प्रसिद्धीची किंवा गाजावाजाची गरज नसते. जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स, पॉवरफुल परफॉर्मन्स आणि अतुलनीय क्लास नेहमीच वेगळं ठरतं आणि उठून दिसतं. तुझ्यासोबत काम करणं हा एक मोठा सन्मान आहे. आपण एकत्र मिळून जे काही साकारलंय, ते जगाला दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे. पुढील अपडेट्स लवकरत.’
प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘महाकाली’ या चित्रपटातून अक्षय खन्ना तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो असूर गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारणार आहे. शुक्राचार्य यांच्या लूकमध्ये अक्षयला ओळखणंही कठीण आहे, इतकं दमदार हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. याआधी विकी कौशलच्या ‘छावा’मध्येही अक्षयने औरंगजेबाची भूमिका साकारली होती, त्यातही त्याला ओळखणं कठीण होतं. औरंगजेबनंतर रेहमान डकैत आणि आता शुक्राचार्य.. या विविधांगी भूमिकांमधून अक्षय त्याचं दमदार अभिनयकौशल्य पुन्हा एकदा सिद्ध करतोय. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सर्वांत प्रतिभावान कलाकारांमध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. परंतु या भूमिकांनी त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
‘महाकाली’ या चित्रपटात इतर कोणकोणते कलाकार असतील, याची माहिती अद्याप उघड करण्यात आली नाही. फक्त अक्षयचा लूक समोर आला आहे. या लूकची नेटकऱ्यांकडून खूप प्रशंसा होतेय. अक्षयच्या या अनोख्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.