Ashok Saraf : वडील गेल्याचा फोन, वातावरण गंभीर, अन्…अलका कुबल यांच्या पतीनं सांगितला अशोक सराफ यांचा डोळे पाणावणारा प्रसंग
Ashok Saraf : अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कॅमेरामन आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत समीर यांनी अशोक सराफ यांचा भावूक प्रसंग सांगितला आहे.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमातही काम केलं आहे. कलाकार अनेकदा काम करत असताना आपलं वैयक्तिक दुःख बाजूला सारून काम करतात. अशोक सराफ यांच्या बाबतीतही असंच काहीसं झालेलं. नुकत्याच एका मुलाखतीत अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये यांनी अशोक सराफ यांच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. वडिलांचं निधन झालंय हे समजल्यानंतरही आपल्या भावना मनात ठेऊन शो मस्ट गो ऑन म्हणत अशोक सराफ यांनी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं.
समीर आठल्ये यांनी सांगितला प्रसंग
अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे प्रसिद्ध कॅमेरामन आहेत. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे, ‘इट्स मज्जा‘ला दिलेल्या मुलाखतीत समीर आठल्ये म्हणाले की, ‘आम्ही ‘तू सुखकर्ता’ नावाचा सिनेमा करत होतो. त्यावेळी मोबाईल नव्हते. एका बंगला होता. त्या बंगल्यावरील टेलिफोनवर फोन यायचे. एक कॉल आला होता, समोरची व्यक्ती म्हणाली की, ‘अशोक सराफांसोबत बोलणं होऊ शकतं का?’, तेव्हा सारखे फोन येत होते. शेवटी फोन घेण्यासाठी आमचे प्रॉडक्शन मॅनेजर गेले. तेव्हा ते शांत झाले.’
‘अशोक सराफ शूटिंगमध्ये होते. त्या बंगल्यातील शूटचा शेवटचा दिवस होता. अशोक सराफ यांना सांगण्याचा प्रयत्न सुरू होता. पण अशोक सराफ सीन शूट करत होते. फोन पुन्हा वाजल्यानंतर एन. एस वैद्य फोन उचलायला गेले. सेटवर आल्यानंतर त्यांना हुंदका आला. आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. अभिनेत्री निशिगंधा होती. कुणालाच कळेना नक्की झालंय काय? मला वैद्य म्हणाले की, जे काही सीन्स उरले आहेत, ते लवकर शूट पूर्ण करुन टाक. वातावरण गंभीर झालं होतं. अशोक सराफ यांना सांगण्यात आलं की, तुझे सीन्स झाले आहेत, शेड्यूलमध्ये पॅकअप झालं आहे, असं वैद्य म्हणाले. यानंतर वैद्य यांना रडू अनावर झालं. अशोक सराफ यांनी त्यांना विचारलं की, काही प्रोब्लेम नाही ना? रिटेक नाही ना? सगळं ओके ना? मी जाऊ का? असं म्हणाले. अशोक सराफ टर्न झाले, तेवढ्यात त्यांचा हुंदका निघाला. ते पळत गेले. तो फोन अशोक सराफ यांचे वडील गेले, हे सांगण्यासाठी होता.’
‘अशोक सराफ निघताना म्हणाले की, मला माहित होतं की, ते सिरिअस आहेत. प्रॉड्यूसरचं काही अडायला नको आणि काम थांबायला नको, म्हणून त्यांनी काम पूर्ण केलं. पहिला फोन आला त्यांना याची कल्पना आली होती. पण हे त्यांचं डेडिकेशन होतं. सीन पूर्ण केल्यानंतरही सर्वांना त्यांनी विचारलं की, काही काम बाकी नाही ना? आणि मग पॅकअप म्हटल्यावर अशोक सराफ निघून गेले.’ असं समीर यांनी शेवटी सांगितलं.