Adinath Kothare: आदिनाथ कोठारेच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा मोठा निर्णय; संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांना देणार
Adinath Kothare: मराठीतील आगामी सस्पेन्स थ्रिलर 'मिरांडा वॉर्निंग' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Adinath Kothare: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर असलेला ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट त्याच्या थरारक ट्रेलरमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या चित्रपटाची चर्चा केवळ त्याच्या कथेमुळे होत नाहीये, तर चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळेही होत आहे. या चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी केली आहे. येत्या 27 नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या नफ्यातून दुष्काळग्रस्तांना मदत
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळाचं सावट असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत समाजाप्रती असलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सचिन धोत्रे यांनी हा निर्णय घेतला आहे. केवळ मनोरंजन करण्यापुरतं चित्रपटाचं माध्यम मर्यादित न ठेवता, त्यातून समाजातील गरजू लोकांनाही मदतीचा हात देता यावा, हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना हातभार लावण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं सचिन धोत्रे यांनी सांगितलं. त्यामुळे ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या कमाईतून मिळणारा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा त्यांचा निर्णय सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे.
आदिनाथ कोठारेसह कलाकारांची फौज
‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटाची निर्मिती सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन धोत्रे यांनी केली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत जान्हवी किल्लेकर, पायल जाधव, सुरेश विश्वकर्मा, वैभव चव्हाण, इरिना राय, एकनाथ गीते, त्रिशा, निलेश गवारे आणि इम्रान तांबोळी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
सस्पेन्स, क्राईम आणि थरार यांची सांगड घालणारा हा चित्रपट 27 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असतानाच दिग्दर्शकाच्या सामाजिक निर्णयामुळेही त्याची चर्चा रंगली आहे.
