Gadar 2 | “तिला अभिनयही धड..”; अमीषा पटेलबद्दल ‘गदर 2’च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने दिग्दर्शक अनिल शर्मा आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसवर काही आरोप केले होते. सेटवर त्यांनी योग्य सुविधा दिल्या नसल्याचं तिने म्हटलं होतं. आता चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अनिल शर्मा हे अमीषाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत.

Gadar 2 | तिला अभिनयही धड..; अमीषा पटेलबद्दल गदर 2च्या दिग्दर्शकांचं वक्तव्य चर्चेत
Ameesha Patel
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 29, 2023 | 3:20 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री अमीषा पटेलने बऱ्याच वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये तिने दिग्दर्शक अनिल शर्मा आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसवर काही आरोप केले होते. सेटवर त्यांनी योग्य सुविधा दिल्या नसल्याचं तिने म्हटलं होतं. आता चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर अनिल शर्मा हे अमीषाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. अमीषा ही श्रीमंत घरातून आली असल्याने कधी कधी तिच्या स्वभावातून ते दिसून येतं, असं ते म्हणाले. इतकंच नव्हे तर जेव्हा तिला ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी निवडलं होतं, तेव्हा ती फारशी चांगली अभिनेत्री नव्हती असंही ते म्हणाले. अमीषाने तिच्या करिअरच्या सुरुवातीलाच दोन मोठे चित्रपट केले होते. कहो ना प्यार है आणि गदर हे तिचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले होते.

अमीषासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण नात्यावर अनिल शर्मा म्हणाले, “माझं कधीच कोणासोबतचं नातं बिघडत नाही. कधी तू-तू, मै-मै झाले, पण नंतर वाद मिटले. अमीषाचा स्वभाव असाच आहे. आधीच्या गदर चित्रपटाच्या वेळी तिच्यासोबत वाद झाला होता. ती मोठ्या घराची मुलगी आहे, तिचे काही नखरे वेगळे आहेत. मात्र ती मनाने चांगली आहे. श्रीमंत घरातून आलेल्यांचे कधी कधी नखरे सहन करावे लागतात. आम्ही तर छोट्या घरातून आलो आहोत. आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागतो आणि राहतो. तीसुद्धा इतरांशी प्रेमाने राहते पण तिचा थोडा ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे.”

22 वर्षांपूर्वी जेव्हा ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी अमीषाची निवड झाली होती, तेव्हा ती अभिनयात कमकुवत होती, असंही अनिल शर्मा म्हणाले. “सकीनाच्या भूमिकेसाठी आम्हाला चंद्रासारखा चेहरा असणारी अभिनेत्री हवी होती. पण अमीषा त्यावेळी अभिनयात कमकुवत होती. अमीषा व्यतिरिक्त आम्ही आणखी एका अभिनेत्रीला शॉर्टलिस्ट केलं होतं. मात्र बऱ्याच विचारानंतर आम्ही अमीषावरच शिक्कामोर्तब केला. कारण सुंदर दिसण्यासोबतच मोठ्या घराण्यातील मुलीचं व्यक्तिमत्त्व तिला शोभणारं होतं. सकीनाच्या भूमिकेसाठी तिने सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं. ती दररोज पाच ते सहा तास माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला यायची. तेव्हा कुठे जाऊन तिला ती भूमिका साकारता आली”, असं त्यांनी सांगितलं.