Mumbai Mayor 2026 : अखेर मुंबईसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर, महिला होणार मुंबईची महापौर
Mumbai Mayor 2026 : मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होत आहे. मुंबईचं महापौरपद कुठल्या प्रवर्गाला मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. मुंबईचा महापौर पुरुष होणार की महिला? हे सुद्धा आता स्पष्ट झालं आहे.

मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी आज मंत्रालयात आरक्षण सोडत सुरु आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत प्रक्रिया सुरु आहे. वेगवेगळ्या महापालिकांसाठी कुठे SC, कुठे ST तर काही ठिकाणी ओबींसीसाठी आरक्षण निघालं आहे. त्यात मुंबईचं महापौरपद कुठल्या प्रवर्गाला मिळणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. अखेर आरक्षण सोडतीत खुल्या वर्गाला म्हणजे ओपन कॅटेगरीला मुंबईच महापौरपद मिळणार हे स्पष्ट झालं आहे. तसच मुंबईच महापौरपद महिलेसाठी राखीव झालं आहे. ओपन कॅटेगरीतली महिलेला महापौरपद मिळणार आहे. त्यामुळे भाजपचा महापौरपद बसवण्याचा मार्ग मोकळ झाला आहे. पण या आरक्षण सोडत प्रक्रियेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईसाठी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला महापौरपद मिळेल अशी अपेक्षा होती.
सोडत प्रक्रिया सुरु असताना हे आक्षेप घेण्यात आल्यामुळे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. एका राज्याच्या बजेटएवढ मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असतो. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं होतं. अखेर मागच्या आठवड्यात निकाल जाहीर झाले. 227 सदस्याच्या मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळून महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले. एकूण मिळून महायुतीच संख्याबळ 118 नगरसेवकांचं आहे. त्यामुळे त्यांचा महापौर होणार हे स्पष्ट आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौर पदाच्या सोडतीवर बहिष्कार टाकला
मागच्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती. पण मुंबईकरांनी यावेळी त्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. यंदा उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. यात उद्धव ठाकरे यांचे 65 आणि राज ठाकरे यांच्या मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले. दोघांचे संख्याबळ मिळून 71 होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौर पदाच्या सोडतीवर बहिष्कार टाकला.
