महाराजांवर चित्रपट म्हणून मी गप्प, काहींची मस्ती उतरवायला हवी..; दिग्पाल लांजेकरांवर का भडकले अमेय खोपकर?

अमेय खोपकर यांनी मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. काही निर्माते फार शेफारले आहेत, त्यांची मस्ती उतरवायला हवी, असं ते थेट म्हणाले. हे नेमकं प्रकरण काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

महाराजांवर चित्रपट म्हणून मी गप्प, काहींची मस्ती उतरवायला हवी..; दिग्पाल लांजेकरांवर का भडकले अमेय खोपकर?
Digpal Lanjekar and Ameya Khopkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 14, 2026 | 9:38 AM

येत्या 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये दोन मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहे. एकीकडे दिग्पाल लांजेकर यांचा ‘रणपती शिवराय- स्वारी आग्रा’ हा चित्रपट आहे, तर दुसरीकडे अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यास, कोणत्या तरी एका चित्रपटाला किंवा दोन्ही चित्रपटांना त्याचा फटका बसणार, यात काही शंका नाही. यावरून आता मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेय खोपकर हे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या निर्मात्यांपैकी एक आहेत.

नुकत्याच एका कार्यक्रमात खोपकर म्हणाले, “एका गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो. इतर निर्माते गप्प बसतात, मी गप्प बसणार नाही. मी बोलणार. विषय असा आहे की ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची प्रदर्शनाची तारीख मी इतर चित्रपटांसाठी तीन वेळा बदलली. दुसऱ्या चित्रपटांना थिएटर्स मिळावेत, दोन-चार आठवडे त्यांना मिळावेत म्हणून मी असा निर्णय घेतला होता. आता दिग्पाल लांजेकरचा ऐतिहासिक चित्रपट, जो आधी 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, त्याने अचानक 30 जानेवारीची घोषणा केली. त्याने कोणाला काही विचारलं नाही किंवा सांगितलं नाही, थेट घोषणा केली.”

“मी दुसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकरला फोन लावला, तेव्हा त्याने म्हटलं, ओह तुमचा चित्रपट आहे का? मला हेच कळलं नाही की, तुमचा चित्रपट आहे का म्हणजे काय? नंतर त्याने डिस्ट्रिब्युटरचं कारण दिलं. मी म्हटलं, डिस्ट्रिब्युटरचा यात काहीही संबंध नसतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्माते ठरवतात. तुम्ही तारीख बदला, तुमचा मोठा चित्रपट आहे. तुमचा चित्रपटदेखील चालला पाहिजे. मी आधी तारीख जाहीर केली होती. एवढं बोलून मी त्याला पुढे कळवायला सांगितलं. मात्र आजतागायत दिग्पालने मला फोन केलेला नाही आणि माझा फोन उचललाही नाही. मी विषय सोडून दिला, पण या गोष्टीचा मी निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आहे, म्हणून गप्प बसलोय. आपण मराठी निर्माते काही बोलत नाही म्हणून काही निर्माते खरंच शेफारले आहेत. त्यांची मस्ती उतरवायला हवी. त्यांच्यावर बंदी आणण्याची गरज आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

आमच्या चित्रपटासाठी ज्या लोकांनी मेहनत घेतली, ती फुकट जाऊ द्यायची का, असा सवाल अमेय खोपकरांनी यावेळी केला. याप्रकरण अद्याप दिग्पाल लांजेकरांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.