Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, ‘कौन बनेगा करोडपती’चं शूटिंग थांबवलं; चाहते चिंतेत
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली असून 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचं शूटिंग एक आठवड्यासाठी थांबवण्यात आलं आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चं (KBC) शूटिंग गेल्या आठवड्यापासून थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात असल्यानं निर्मात्यांनी नवीन भागांचं शूटिंग तात्पुरतं थांबवलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे शूटिंगला ब्रेक
आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ‘कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगला आठवडाभरासाठी ब्रेक देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन सध्या फारसं बरं वाटत नसल्यामुळे निर्मात्यांनी नवीन भागांचं चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चॅनेलनं दिवाळी विशेष कार्यक्रमांतर्गत काही आठवड्यांपूर्वी शूट केलेले सेलिब्रिटी स्पेशल एपिसोड पुन्हा प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत.
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांचा एपिसोड चर्चेत
‘कौन बनेगा करोडपती’च्या शेवटच्या मोठ्या सेलिब्रिटी स्पेशल एपिसोडमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे सहभागी झाले होते. आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी शोमध्ये हजेरी लावली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आसपास हा विशेष भाग प्रसारित करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता निर्माण झाल्यानंतर प्रसारणाचं संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आलं. त्यानंतर दिवाळी विशेष आठवड्याची सुरुवात ‘रामायण’च्या टीमच्या एपिसोडने करण्यात आली.
अमिताभ बच्चन यांची प्रकृती सुधारल्यास पुढील आठवड्यापासून ‘कौन बनेगा करोडपती’चं शूटिंग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची तब्येत साथ देत असेल तरच शूटिंग सुरू करण्यात येईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शनिवारी आपल्या ब्लॉगमध्ये कामावर आणि नियमित दिनचर्येवर पुन्हा हळूहळू परतत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी लिहिलं की, ‘नियमित दिनचर्येकडे आणि कामाच्या नियंत्रित आयुष्याकडे हळूहळू परतण्याचा प्रवास सुरू आहे. जेव्हा आपण रोजच्या दिनक्रमात असतो, तेव्हा त्याची सवय होते. मात्र, काही काळ दिनक्रमापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी वेगळ्या वाटू लागतात.’ याशिवाय त्यांनी चष्मा आणि मोबाईल कुठे ठेवला, तसेच पुढे काय करायचं होतं, अशा छोट्या गोष्टी कधीकधी विसरायला होत असल्याचंही नमूद केलं.