
बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांच्या एनर्जी आणि काम करण्याच्या क्षमतेबद्दल वेगळं काही बोलण्याची आवश्यकता नाही. सर्वांनाच त्यांच्या कामाच्या वेडाबद्दल तसचं त्यांच्या शिस्तीबद्दल माहित आहे. या वयातही त्यांचा उत्साह हा तरूणांना लाजवेल असाच आहे. अमिताभ बच्चन हे गेल्या 56 वर्षांहून अधिक काळापासून चित्रपटसृष्टीत आहेत
मेकअप आर्टिस्टने सांगितले अमिताभ यांच्यासोबतचे नाते
त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत असलेले एक व्यक्ती म्हणजे त्यांचे विश्वासू मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत, जे गेल्या 53 वर्षांपासून अमिताभ यांना तयार करत आहेत. त्यांची पहिली भेट 1972 मध्ये आलेल्या “रस्ते का पत्थर” चित्रपटाच्या सेटवर झाली. गेल्या काही दशकांमध्ये त्यांचे नाते इतके खोलवर गेले की मेगास्टारने सावंत निर्मित भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये “गंगोत्री” 2007 आणि 2012 मध्ये आलेल्या “गंगा देवी” चित्रपटात समावेश आहे, ज्यामध्ये अभिनेत्री जया बच्चन देखील होत्या.
मला त्याच्यांसाठी कधी लढावे लागले तर….
इतक्या वर्षांनंतर, दीपकने अलीकडेच त्याच्या दीर्घकालीन नात्याबद्दल आणि अमिताभ यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले “मी अनेकदा देवाला सांगतो की माझा त्याच्यावर आणि त्याच्यानंतर अमिताभ बच्चनवर पूर्ण विश्वास आहे . त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला दिलेले प्रेम आणि आदर शब्दांच्या पलीकडे आहे. त्यांच्या स्वभावामुळे, मी नेहमीच त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. जर मला त्याच्यांसाठी कधी लढावे लागले तर मी तेही करेन. जर मला अमिताभ बच्चन यांच्यासाठी लढावे लागले तर मी माझ्या जीवाचीही पर्वा करणार नाही.”
अमिताभ बच्चन दिवसाचे 16 तास काम करतात.
बिग बींच्या कामाच्या शैलीबद्दल बोलताना सावंत म्हणाले की, त्यांच्यामुळे कोणत्याही निर्मात्याचे नुकसान होऊ नये याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे. “ते नेहमीच नियोजित वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी सेटवर येतात. ते कोणत्याही निश्चित शिफ्टचे पालन करत नाहीत. गरज पडल्यास, ते सतत 16 तास काम करतात आणि निर्माता सांगेपर्यंत थांबत नाहीत. सुरुवातीपासूनच त्यांचा हा दिनक्रम आहे आणि आजही सुरू आहे.”
10 वेळा रिहर्सल करतात
दीपक म्हणाले की, इंडस्ट्रीमध्ये पाच दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतरही, बिग बींचे त्यांच्या कामाबद्दलचे समर्पण अतुलनीय आहे. सावंत म्हणाले, “मी त्यांना ‘रस्ते का पत्थर’ पासून ओळखतो. 50 पेक्षा जास्त वेळा एक दृश्य वाचण्याची त्यांची सवय तशीच आहे. प्रत्येक टेकपूर्वी तो किमान 10 वेळा रिहर्सल करतात. त्यांना इतर कोणीही त्याच्यांसोबत असण्याची अपेक्षा नाही. ते एकटेच सराव करतात. म्हणून त्यांचा पहिला टेक हा नेहमीच सर्वोत्तम असतो. दुसरा टेक असतानाही, पहिला टेक वेगळा दिसतो.”
53 वर्षांत अमिताभ बच्चनसारखा शिस्तप्रिय अभिनेता पाहिला नाही
सावंत यांनी पुढे असाही दावा केला की त्यांच्यासारखा स्टार कधीच झाला नाही. ते म्हणाले, “गेल्या 53 वर्षांत मी अमिताभ बच्चनसारखा वक्तशीर आणि शिस्तप्रिय अभिनेता पाहिला नाही. अक्षय कुमार काहीसा वक्तशीर आहे, पण त्याचे कामाचे तासही निश्चित आहेत. तो एका विशिष्ट वेळी येतो आणि एका विशिष्ट वेळी निघून जातो. दुसरीकडे, अमिताभ बच्चन सलग 16 तास काम करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर सेटवर परतात. जोपर्यंत निर्माता पॅक अप करण्याचा आदेश देत नाही तोपर्यंत ते सेटवरून निघत नाही.”