Jhund Trailer: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!

| Updated on: Feb 23, 2022 | 6:05 PM

'झुंड'च्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर 'सैराट' या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

Jhund Trailer: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या झुंडचा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!
Image Credit source: Instagram
Follow us on

Jhund Trailer: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केलं आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘झुंड’च्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. क्रीडा प्रशिक्षक विजय आणि त्यांच्या टीमच्या संघर्षाची झलक या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय. नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शनाचा ठसा या ट्रेलरमध्ये चांगलाच उमटला आहे. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या मुलांची टीम बनवू पाहण्याचं स्वप्न विजय पाहत असतात. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुलांना कॉलेज कॅम्पसमध्ये आणण्याला अनेकांचा विरोध असतो. अशा मुलांचं आयुष्य ते कशा पद्धतीने बदलतात हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळेल. दमदार संवाद, अंगावर रोमांच उभं करणारं पार्श्वसंगीत, किंचितही ग्लॅमर नसतानाही लक्षवेधी ठरणारे कलाकारांचे लूक ही या ट्रेलरची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नागराज मंजुळे पुन्हा याड लावणार

‘सैराट’ या चित्रपटाचं अभूतपूर्व यश पाहता नागराज मंजुळे यांच्या या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. त्यातच चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाल्याने प्रेक्षकांची निराशासुद्धा झाली होती. ही कसर भरून काढण्यात ‘झुंड’चा टीझर तसा काहीसा अपयशीच ठरला असं म्हणावं लागेल. मात्र ट्रेलरने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष चित्रपटाकडे वेधलं आहे. सोशल मीडियावरही या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सत्य घटनेवर आधारित चित्रपट
अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली.

अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने चित्रपटाला संगीत दिलं आहे. चित्रपटात छाया कदम आणि किशोर कदम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गेल्या तीन वर्षांत अनेकदा या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. जवळपास दोन वर्षांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर पहिला टीझर हा दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. सप्टेंबर २०१९ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र त्यादरम्यान कोरोना, लॉकडाउन असे काही अडथळे प्रदर्शनाच्या वाटेत निर्माण झाले. निर्मात्यांनी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार केला होता, मात्र नागराज मंजुळेंना हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याची इच्छा होती.