
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते सतत विविध पोस्ट लिहित असतात. त्यांच्या या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये सतत चर्चा होत असते. नुकताच त्यांनी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशीही त्यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलेल्या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. आता पुन्हा त्यांनी असं काही लिहिलंय, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलंय. बिग बींनी अशी पोस्ट का लिहिली, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. इतकंच नव्हे तर काहींनी त्यावरून मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
‘T 5533- निकाल दिया’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. यातील T चा अर्थ ‘ट्विट’ असा होतो. बिग बी त्यांच्या प्रत्येक पोस्टच्या आधी T असं लिहून त्या पोस्टचा आकडा लिहितात. परंतु त्यांनी ‘निकाल दिया’ म्हणजेच काढून टाकलं असं का लिहिलंय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कोणाला काढून टाकलं आणि का, असा सवाल नेटकरी करत आहेत. अशातच काहींनी त्यावरून मस्करी करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी कमेंटमध्ये त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा उल्लेख केला तर काहींनी मुलगा अभिषेकचा उल्लेख करत मस्करी केली.
T 5533 – निकाल दिया
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 15, 2025
‘अभिषेकने तुम्हाला घराबाहेर काढून टाकलं का’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘जया बच्चन यांच्यासोबत का भांडण केलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. यावरून काही नेटकरी मजेशीर मीम्ससुद्धा शेअर करत आहेत. ‘जयाजींची माफी मागून घ्या, कदाचित पुन्हा बोलावून घेतील’ अशी मस्करी नेटकऱ्यांनी केली आहे. आता या पोस्टमधून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, याचा खुलासा बिग बीच करू शकतील. याआधीही त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट अनेकदा लिहिले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन करत आहेत. याशिवाय ते ‘कल्की 2898 एडी’, ‘सेक्शन 84’ आणि ‘ब्रह्मास्त्र: पार्ट 2’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.