अमिताभ-रेखा यांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 45 वर्षांपासून चाहत्यांचं आवडतं, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक
45 वर्षांनंतरही रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रचंड रोमँटिक गाणं. आजही प्रत्येक तरुणाच्या मनावर राज्य करत आहे हे गाणं.

बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आजही अनेक वर्षानंतर देखील प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. उलट प्रत्येक नव्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी आजही तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. अशाच अजरामर गाण्यापैकी एक म्हणजे 1981 साली प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे गाणं. मधुर संगीत, भावपूर्ण शब्द आणि अमिताभ बच्चन-रेखा यांची अप्रतिम केमिस्ट्री यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
मात्र या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा फार कमी लोकांना माहिती आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सुरुवातीला हे गाणं लिहिण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यावेळी त्यांनाही कल्पना नव्हती की, पुढे जाऊन हेच गाणं त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर गाण्यांपैकी एक ठरले.
यश चोप्रांची खास रोमँटिक गाण्याची इच्छा
सिलसिला या चित्रपटात अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांना या चित्रपटासाठी एक वेगळे, मनाला भिडणारे रोमँटिक गाणे हवे होते. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम ज्येष्ठ कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्याशी संपर्क साधला. मात्र काही कारणांमुळे त्यांच्याकडून हे गाणे होऊ शकले नाही.
यानंतर यश चोप्रांनी जावेद अख्तर यांच्याकडे धाव घेतली. सुरुवातीला जावेद अख्तर यांनी हे गाणे लिहिण्यास नकार दिला. मात्र यश चोप्रांच्या आग्रहाखातर त्यांनी अखेर होकार दिला आणि ‘देखा एक ख्वाब’ या गाण्याची निर्मिती केली.
अमिताभ-रेखा यांच्या केमिस्ट्रीने जिंकली मने
या गाण्यात अमिताभ बच्चन आणि रेखा यांची अप्रतिम ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. सुंदर लोकेशन्स, भावपूर्ण अभिनय आणि सुरेख छायांकन यामुळे हे गाणे अधिकच संस्मरणीय बनले.
तब्बल 45 वर्षे उलटून गेली असली तरी त्याची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. रोमँटिक गाण्यांची यादी तयार झाली की ‘देखा एक ख्वाब’ हे नाव आजही आवर्जून घेतले जाते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कारकिर्दीतील हे एक मैलाचा दगड ठरलेले गाणे असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर रोमँटिक गाण्यांमध्ये त्याची गणना केली जाते.