फक्त अभिनेत्याच्या आवाजाने चित्रपट झाला ब्लॉकबस्टर, चित्रपटाच्या तिकिटासाठी रस्त्यावर झोपायचे लोक

एखाद्या व्यक्तीच्या आवाजामध्ये किती ताकद असते हे 1975 मधील या चित्रपटावरून समजेल. या चित्रपटातील खलनायकाच्या आवाजामुळे चित्रपट ठरलेला ब्लॉकबस्टर.

फक्त अभिनेत्याच्या आवाजाने चित्रपट झाला ब्लॉकबस्टर, चित्रपटाच्या तिकिटासाठी रस्त्यावर झोपायचे लोक
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 22, 2026 | 8:31 AM

हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट आणि कलाकार आहेत, ज्यांच्या करिअरमध्ये असे काही निर्णय आले ज्यांमध्ये काहीचे करिअर खराब झाले तर काही कलाकारांचे एका निर्णयामुळे करिअरला मोठी चालना मिळाली. असाच एक चित्रपट ज्यामधील कलाकाराच्या आवाजामुळे चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर.

1975 साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. पण या चित्रपटातील सर्वात गाजलेली भूमिका गब्बर सिंग. सुरुवातीला अमजद खान यांच्याकडे नव्हती. ही गोष्ट अनेकांना माहिती नाही. या भूमिकेमागची कहाणी तितकीच नाट्यमय आहे.

छोट्या संधीने बदलले आयुष्य

दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘शोले’ची कास्टिंग सुरू केली तेव्हा गब्बर सिंगची भूमिका आधीच डैनी डेन्जोंगपा यांना देण्यात आली होती. मात्र शूटिंगच्या तारखा ठरवल्यानंतर डॅनी यांना लक्षात आले की त्यांच्या तारखा धर्मात्मा या फिरोज खान यांच्या चित्रपटाशी जुळत आहेत. वेळ अत्यंत कमी असल्याने डॅनींना ‘शोले’ सोडावा लागला.

गब्बर सिंग हा चित्रपटाचा मध्यवर्ती खलनायक असल्याने निर्मितीसंघात घबराट पसरली. अशा वेळी पटकथाकार सलीम खान यांनी अमजद खान यांचे नाव सुचवले. सलीम खान त्यांना लहानपणापासून ओळखत होते आणि त्यांना खात्री होती की अमजद ही भूमिका समर्थपणे साकारू शकतात.

अमजद खान त्या काळात मोठ्या ब्रेकच्या शोधात होते. नाटकांत त्यांनी चांगले काम केले होते पण चित्रपटसृष्टीत त्यांची ठोस ओळख निर्माण झाली नव्हती. अमजद खान रमेश सिप्पी यांना भेटले. सिप्पींना त्यांचा चेहरा वेगळा आणि प्रभावी वाटला. त्यांनी अमजद यांना दाढी वाढवण्यास सांगितले आणि हाच छोटासा संकेत त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

भूमिकेसाठी प्रचंड तयारी

गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमजद खान यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. त्यांनी चंबळच्या दरोडेखोरांवर आधारित ‘अभिशप्त चंबल’ हे पुस्तक अभ्यासायला सुरुवात केली. हे पुस्तक अभिनेत्री जया बच्चन यांच्या वडिलांनी तरुण कुमार भादुड़ी यांनी लिहिले होते. या पुस्तकातून अमजद यांना खऱ्या दरोडेखोरांची मानसिकता, जीवनशैली आणि वर्तनशैली समजून घेता आली.

त्यांच्या घरी त्यांची गर्भवती पत्नी शायला खान रिहर्सल पार्टनर बनली. बालपणीचा एक धोबी, जो आपल्या पत्नीला ‘अरे ओ शांती’ अशी लांबट हाक मारायचा, ती आठवण अमजद यांच्या मनात घर करून राहिली. त्यातूनच पुढे गब्बरची अमर ओळ जन्माला आली ‘अरे ओ सांभा!’ भूमिकेसाठी त्यांनी दाढी वाढवली, दात काळे केले आणि स्वतःचा संपूर्ण लूक बदलला. स्क्रीन टेस्टला ते पूर्णपणे गब्बर सिंगच्या रूपातच पोहोचले आणि त्यांना भूमिका मिळाली.