Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर नवऱ्यापासून राहतेय वेगळं; खरं कारण आलं समोर
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा हे गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळे राहत आहेत. या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने याविषयीची माहिती उघड केली आहे. यामागचं कारणसुद्धा समोर आलं आहे.

सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा काही नवीन नाहीत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांनी विभक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एका सेलिब्रिटी जोडपं गेल्या दीड वर्षापासून वेगळं राहत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा गेल्या काही काळापासून वेगवेगळे राहत आहेत. परंतु दोघांमध्ये विभक्त होण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. अमृता आणि हिमांशू यांनी जानेवारी 2015 मध्ये लग्न केलं होतं. लग्नापूर्वी दोघं बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता वेगवेगळे राहत असूनही दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचं कळतंय.
अमृता आणि हिमांशूच्या जवळच्या व्यक्तीने याविषयी सांगितलं, “होय, अमृता आणि हिमांशू गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत आहेत. पण त्यांच्यात कायदेशीररित्या विभक्त होण्याबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांची मैत्री अजूनही घट्ट आहे आणि नियमितपणे संपर्कात राहून वैयक्तिक आणि कामाच्या बाबींवर चर्चा करतात. आर्थिक बाबी, करिअरमधील वेगवेगळे प्राधान्यक्रम आणि आपापल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या यांसारख्या घटकांमुळे त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीमुळे सध्यापुरतं वेगवेगळ्या घरांमध्ये राहणं त्यांना अधिक योग्य वाटलं. त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय आहे, हे ठरवण्यासाठी ते वेळ घेत आहेत. नंतर ते एकत्र येतील की कायदेशीररित्या विभक्त होतील, याचा निर्णय ते फक्त वेळेनुसारच ठरवू शकतात.”
याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या प्रतिनिधींनी अमृता आणि हिमांशू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “आमचं लग्न अजूनही टिकून आहे. त्यापलीकडे आम्हाला आमच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीच भाष्य करायचं नाही.” 2004 मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या शोच्या सेटवर अमृता आणि हिमांशू यांची भेट झाली होती. याच शोमध्ये दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी 2015 मध्ये ‘नच बलिये 7’मध्ये भाग घेतला आणि या सिझनचे ते विजेतेसुद्धा ठरले होते.
अमृता ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केलंय. तर ‘राजी’, ‘हिंमतवाला’, ‘फूंक’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय. दुसरीकडे हिमांशूनेही बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.