प्रभास नव्हे तर ‘या’ व्यक्तीशी लग्न करणार ‘बाहुबली’ची देवसेना

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेता प्रभाससोबत तिची जोडी तुफान चर्चेत होती. मात्र वारंवार त्यांनी अफेअरच्या चर्चा फेटाळल्या होत्या.

प्रभास नव्हे तर या व्यक्तीशी लग्न करणार बाहुबलीची देवसेना
Prabhas and Anushka Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2024 | 2:09 PM

अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने अभिनेता प्रभाससोबत मुख्य भूमिका साकारली होती. प्रभाससोबत अनुष्काची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र दोघांनी वेळोवेळी या चर्चा फेटाळल्या आहेत. आता अनुष्काच्या लग्नबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. अभिनेता प्रभासशी नव्हे तर एका कन्नड चित्रपट निर्मात्याशी ती लग्न करणार असल्याचं कळतंय.

अनुष्काने संबंधित कन्नड निर्मात्याशी साखरपुडा केला असून दोघांच्या लग्नाचीही तारीख ठरल्याचं कळतंय. मात्र याबाबत अद्याप अनुष्काने मौन बाळगलं आहे. ‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काच्या होणाऱ्या पतीचं वय 42 वर्षे आहे. या कन्नड निर्मात्याचं नाव अद्याप समोर आलं नाही. लग्नाबाबत अनुष्का जाहीररित्या कधी माहिती देणार, याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

‘बाहुबली’ फेम प्रभास आणि अनुष्काची जोडी तुफान चर्चेत होती. मात्र अनुष्काने वेळोवेळी डेटिंगच्या चर्चा नाकारल्या आहेत. प्रभास आणि मी फक्त चांगले मित्र आहोत, असं तिने स्पष्ट केलं होतं. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी प्रभासला जेव्हा लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा तो म्हणाला, “मी इथेच तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे.” आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभास त्याच्या लग्नाची घोषणा करू शकतो, असा अंदाज त्यावेळी व्यक्त केला जात होता. मात्र प्रभासनेही त्याच्या लग्नाबाबत अद्याप मौन बाळगलं आहे.

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनुष्का शेट्टीला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेल्या देवसेना या भूमिकेला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळालं. रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी जवळपास सहा कोटी रुपये मानधन घेते. ती 120 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असल्याचं म्हटलं जातं.