मी कुठे पळून जातेय का? विमानप्रवासादरम्यान अरबाजच्या ‘त्या’ कृतीवर पत्नीची पोस्ट

अभिनेता अरबाज खानच्या पत्नीने त्यांच्या विमान प्रवासातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अरबाज शुराचा हात पकडून झोपल्याचं पहायला मिळतंय. या फोटोसोबतच शुराने गमतशीर पोस्ट लिहिली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मी कुठे पळून जातेय का? विमानप्रवासादरम्यान अरबाजच्या त्या कृतीवर पत्नीची पोस्ट
Arbaaz Khan and Shura Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 08, 2025 | 10:01 AM

अभिनेता अरबाज खानने 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा लग्न केलं. सुरुवातीला माध्यमांपासून चार हात लांब राहणारी शुरा आता मोकळेपणे व्यक्त होताना आणि वावरताना दिसते. सोशल मीडियावर दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. नुकताच शुराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अरबाजसोबतचा एक फोटो पोस्ट केला. अरबाज तिच्याबाबतीत किती ‘प्रोटेक्टिव्ह’ आहे हे तिने या फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये दोघं विमानातून प्रवास करताना दिसत आहेत. या प्रवासादरम्यान अरबाज झोपला आहे, परंतु झोपेतच त्याने त्याच्या पत्नीचा हात पकडून ठेवला आहे. हाच क्षण शुराने तिच्या कॅमेरामध्ये टिपला आणि तो आता तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोसोबतच शुराने लिहिलंय, ‘बेबी.. मी कुठे पळून जात नाहीये.’ अरबाज-शुराची ही केमिस्ट्री काही नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. अरबाजसुद्धा त्याच्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. लग्नाच्या जवळपास 20 वर्षांनंतर 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले होते. त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये अरबाजने शुराशी निकाह केला. बहीण अर्पिका खानच्या घरातच या दोघांनी निकाह केला होता. यावेळी मोजके कुटुंबीय आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. अरबाज आणि शुराला अनेकदा त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोल करण्यात आलंय. इतकंच नव्हे तर शुरा ही अरबाजची पत्नी नव्हे तर मुलगी वाटते, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते.

वय आणि उंचीवरून ट्रोल करणाऱ्यांना शुराने एका पोस्टद्वारे सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘अरबाजची उंची 5’10 फूट आहे आणि माझी उंची 5’1 फूट इतकी आहे. बाकी वय हा केवळ आकडा आहे’, असं तिने लिहिलं होतं. रवीना टंडनच्या ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुरा ही अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानीची मेकअप आर्टिस्ट आहे.