
अभिनेता अर्जुन रामपालचं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. एका मुलाखतीत अर्जुन त्याच्या एका चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. त्याच मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो अभिनेत्री करीना कपूरसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल बोलत होता. परंतु या मुलाखतीत अर्जुन जे बोलला, ते काही नेटकऱ्यांना अजिबात पसंत पडलं नाही. नेटकरी त्याच्यावर टीकेचा वर्षाव करत आहेत. 2012 मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने करीनासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. या दोघांनी ‘हिरोइन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मधुर भंडारकरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
याच चित्रपटात करीना आणि अर्जुन यांचा इंटिमेट सीन होता. त्यावर अर्जुन म्हणाला की त्याने करीनासोबतच्या इंटिमेट सीनला एंजॉय केलं होतं. “मी आजसुद्धा करीनासोबतचा तो प्रेमळ सीन माझ्या मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवला आहे”, असं त्याने सांगितलं. अनेकांना अर्जुनचं हे वक्तव्य अजिबात आवडलं नाही. ते अत्यंत अनप्रोफेशनल आणि विचित्र असल्याचं मत काही नेटकऱ्यांनी मांडलं आहे.
‘हिरोइन’ हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये करीना कपूर, अर्जुन रामपाल, रणदीप हुडा, मुग्धा गोडसे आणि दिव्या दत्ता यांसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा माही या व्यक्तिरेखेभोवती फिरते, जी एक अभिनेत्री असते. एका विवाहित व्यक्तीवर (अर्जुन रामपाल) तिचं प्रेम असतं. परंतु तो तिल कमिटमेंट देण्यासाठी तयार नसतो. अशातच जेव्हा तिच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होतो, तेव्हा ती नैराश्यात जाते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं.
करीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती ‘सिंघम अगेन’मध्ये झळकली होती. यामध्ये तिने अवनी सिंघमची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर केला होता. त्याआधी करीनाचा ‘क्रू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये करीनासोबत तब्बू आणि क्रिती सनॉनची मुख्य भूमिका होती.