Nitin Desai | नितीन देसाई यांचं लालबागच्या राजाशी खास कनेक्शन; महिनाभरापूर्वी शेअर केले होते ‘हे’ फोटो

आपल्या 58 व्या वाढदिवसाच्या (6 ऑगस्ट) अवघ्या तीन दिवस आधी नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. एनडी स्टुडिओ किंवा राहत्या घरी त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणती पत्र लिहिलं होतं का, याचाही तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Nitin Desai | नितीन देसाई यांचं लालबागच्या राजाशी खास कनेक्शन; महिनाभरापूर्वी शेअर केले होते हे फोटो
Nitin Desai
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2023 | 12:30 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधल्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून कर्जत पोलीस अधिक तपास करत आहेत. आपल्या 58 व्या वाढदिवसाच्या (6 ऑगस्ट) अवघ्या तीन दिवस आधी नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. एनडी स्टुडिओ किंवा राहत्या घरी त्यांनी आत्महत्येपूर्वी कोणती पत्र लिहिलं होतं का, याचाही तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील काही फोटोंकडे नेटकऱ्यांचं लक्ष गेलं आहे. जवळपास महिनाभरापूर्वी त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो ‘लालबागचा राजा’शी संबंधित होते.

मुंबईच्या ‘लालबागचा राजा’चं यंदा 90 वं वर्ष आहे. या नव्वदाव्या वर्षीचं मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा नितीन देसाई यांनीच केला होता. त्याचे खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. ‘लालबागच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो. लालबागच्या राजाच्या 90 व्या वर्षीच्या मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला. गणपती बाप्पा मोरया,’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. तर आणखी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘आमच्या लालबागच्या राजाचं आगमन जवळ आलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने मुहूर्त आणि पूजाअर्चना पार पडली.’

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी नितीन देसाईंच्या निधनावर शोक व्यक्त केला. “आमच्यासाठी ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. ते रविवारी आमच्यासोबत जवळपास दोन तास त्यांच्या टीमसह मंडपाच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्यावेळी ते अगदी सामान्य होते. असं काही घडू शकतं याचा कोणताही मागमूस नव्हता. नितीन देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते आणि 2009 पासून ते आमच्याशी जोडले गेले आहेत. मध्यंतरी एके वर्षी त्यांची प्रकृती ठीक नसताना त्यांनी मंडपरचना केली नव्हती. पण 2009 नंतर ते सतत आमच्यासोबत काम करत होते. त्यांनी नेहमी वेळेवर काम पूर्ण केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुक सर्वांकडून झालं.”