
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सात जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. याविषयी अशोक सराफ यांनी आनंद व्यक्त केला. “गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. यावर्षाची सुरुवात देशातील प्रतिष्ठेचा सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराच्या घोषणेनं झाली. अजून एक पायरी वर चढलो. मी आजवर जे काम केलं, त्याची देशपातळीवरही दखल घेतली गेली, याचा आनंद वाटतो. रसिक प्रेक्षकांच्या सदिच्छा माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या प्रेमाशिवाय हे यश साध्य झालं नसतं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
याविषयी ते ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. मी आणखी पायरी वर चढलोय. पद्मश्री हा भारत सरकारचा पुरस्कार आहे. त्यामुळे मी अधिक आनंदी आहे. आपल्याला काहीतरी मिळावं अशी माझी इच्छा होती, पण इतकं मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. कलाकार पहिल्यांदा रंगभूमीवर तयार होतो. आपल्या मराठी कलाविश्वात अनेक प्रतिभावान कलाकार आहेत. आम्ही इतक्या वर्षांपासून मेहनत केली, त्यावर आता भारत सरकारकडून शिक्का बसला. मी सरकारचा ऋणी आहे.” यावेळी अशोक सराफ यांना बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो.”
पद्म पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांमध्ये 23 महिला असून 10 जण परदेशी नागरिक आहेत. 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला. अशोक सराफ यांच्यासोबतच वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली, सुलेखनकार अच्युत पालव, बँक व्यावसायिक अरुंधती भट्टाचार्य, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, चित्रकार वासुदेव कामत, वन्यजीव संवर्धक चैत्राम पवार, पारंपरिक विणकाम आणि हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर, गोवा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, ब्राझीलमध्ये वेदान्त आणि गीता शिकवणारे अध्यात्मिक गुरू जोनास मासेट्टी, कुवेतमधील योग प्रशिक्षक शेखा एजे अल सबा, माजी क्रिकेटपटू आर. अश्विन, पॅरालिम्पिक तिरंदाज हरविंदर सिंग, गायिका जरपिंदर नरुला, गायक अरिजीत सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.