अचानक लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज आला अन् अख्खा पुरस्कार सोहळा सुन्न, अशोक सराफांच्या डोळ्यात पाणी

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात त्यांना एक आभासी फोन येतो आणि तो त्यांच्या जवळच्या आणि अगदी जीवलग मित्राचा. या फोनवरील आवाजामुळे सगळ्यांचेच डोळे पाणावतात आणि अख्खा पुरस्कार सोहळाच सुन्न पडतो.

अचानक लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज आला अन् अख्खा पुरस्कार सोहळा सुन्न, अशोक सराफांच्या डोळ्यात पाणी
Ashok Saraf gets emotional
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 11, 2025 | 12:15 PM

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे. कारण डान्सपासून ते नवीन मालिकांच्या घोषणेपर्यंत बरंचकाही घडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही या सोहळ्याची आवर्जून वाट पाहत आहेत. 16 मार्चला ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळा संध्याकाळी 7 वाजता दाखवण्यात येणार आहे.

पुरस्कार सोहळ्यातील एक खास व्हिडीओ समोर

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याचं यंदा पाचवं वर्ष आहे.तसेच या सोहळ्यातील काही छोटे छोटे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातील एक म्हणजे अशोक सराफ यांच्या सन्मानाचा. आणि या व्हिडीओची खास बात म्हणजे या व्हिडीओमध्ये ते आभासी पद्धधतीने का होईना पण आपल्या जीवलग मित्राला म्हणजे लक्ष्यासोबत संवाद साधताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सर्वच भावूक झालेले पाहायला मिळत आहेत.

अशोक सराफांचा सन्मान 

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याचं यंदा पाचवं वर्ष आहे. यानिमित्ताने या अवॉर्ड शोमध्ये यावर्षी महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मराठी मालिका असो किंवा चित्रपट अशोक सराफ यांनी कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला. यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’ च्या कलाकारांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर करून त्यांचा सन्मान केला.

अशोक सराफांना लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन 

या पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांवर कलाकारांनी विविध परफॉर्मन्स सादर केले. सगळ्या कलाकारांनी मिळून मंचावर त्यांचं औक्षणही केलं. यानंतर अशोक सराफांना अचानक एक आभासी फोन येतो. हा फोन असतो त्यांचा जिवलग मित्र दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या दोघांच्या ‘दोस्ती’चे किस्से हे फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळतात. या जोडीचे सर्वचजण फॅन आहेत. स्तरांतून प्रेम मिळालं. मात्र, आजारपणामुळे 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला. अन् त्यांच्या मित्रांच्या आयुष्यातील त्यांची जागा रिकामी झाली ती कायमचीच.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवाजाने अख्खा सोहळा सुन्न अन् डोळ्यात पाणी 

आजही अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे नेहमीच आपल्या जवळच्या मित्राची आठवण काढतात. लक्ष्मीकांच बेर्डे यांना इंडस्ट्रीत प्रेमाने ‘लक्ष्या’ असं म्हटलं जायचं. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांच बेर्डे यांचा आभासी फोन आल्यावर अशोक सराफ यांचे डोळे पाणावले. उपस्थित सगळेच कलाकार यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

या फोनवर येणारा ‘लक्ष्या’चा आवाज असा होता “हॅलो हॅलो अशोक… अरे आपण जवळपास 50 चित्रपट एकत्र केले मज्जा… तुझा आज होणारा सन्मान पाहून डोळे भरून आले बघ. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. ही दोस्ती तुटायची नाय…” आभासी फोनवरचे आपल्या मित्राचे हे शब्द ऐकताच अशोक सराफ यांचे डोळे पाणावले. निवेदिता सराफ, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, रुपाली भोसले अशा सोहळ्याला उपस्थित असलेल्या सगळ्याच कलाकारांचे डोळे पाणावले आणि अख्खा सोहळाच जणू सुन्न झाला.’स्टार प्रवाह वाहिनी’ने ‘ही दोस्ती तुटायची नाय… अशोक सराफ यांचा सन्मान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण यामुळे सगळ्यांचेच डोळे पाणावले.’ अशा कॅप्शनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.