‘सैराट’ फेम सल्ल्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे उपचारादरम्यान निधन
'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेखवर कोसळला दु:खाचा डोंगर. वडील अस्लम शेख यांचे उपचार सुरु असतानाच दुर्दैवी निधन.

‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे मेंदूशी संबंधित आजारावर उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर विविध टप्प्यांमध्ये उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे शेख कुटुंबावर शोककळा पसरली असून, चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकांनीही दुःख व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम शेख यांच्यावर सुरुवातीला सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूशी संबंधित गंभीर आजारामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. वडिलांची तब्येत सुधारावी यासाठी अरबाज शेख सातत्याने धावपळ करत होता. उपचारांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचा तो प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत, ‘मला माझ्या वडिलांना वाचवायचे आहे,’ अशी आर्त हाक दिली होती. या व्हिडिओने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.
दरम्यान, उपचारादरम्यान अरबाजने संबंधित खासगी रुग्णालयावर गंभीर आरोपही केले होते. रुग्णालय प्रशासनाकडून उपचारांच्या नावाखाली वारंवार मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा दावा त्याने सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे केला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने संबंधित रुग्णालयाशी संबंधित मेडिकलवर कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
या घटनेनंतर शिवसेना शिंदे पक्षाकडूनही अरबाज शेख आणि त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. त्यानंतर अस्लम शेख यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आणि शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सैराट चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारून अरबाज शेखने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर तो विविध प्रकल्पांमधून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहिला. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून वडिलांच्या प्रकृतीमुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. त्यांच्या उपचारांसाठी त्याने खूप धडपड केली पण उपचार सुरु असतानाच त्यांचं निधन झालं.