
बॉलिवूड अभिनेता सलमान खाननंतर आता प्रसिद्ध गायकाला लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून पैशांची मागणी करत धमकी देण्यात आली आहे. हा गायक आहे बी प्राक. तो आपल्या दमदार गायकीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची गाणी रिलीज होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतात. मात्र, सध्या बी प्राक त्याच्या गाण्यांमुळे नाही तर त्याला मिळालेल्या गंभीर धमकीमुळे चर्चेत आला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून बी प्राकला थेट 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बी प्राकचे सहकारी आणि ऑडिओ रेकॉर्डिंगशी संबंधित पंजाबी गायक दिलनूर यांना 5 जानेवारी रोजी दोन वेळा फोन कॉल आले होते. मात्र, ते कॉल त्यांनी रिसीव केले नाहीत. त्यानंतर 6 जानेवारी रोजी एका विदेशी नंबरवरून पुन्हा कॉल आला. कॉल उचलल्यानंतर संशयास्पद आणि विचित्र वाटल्याने दिलनूर यांनी तो कॉल कट केला. त्यानंतर ऑडिओ मेसेजद्वारे थेट धमकी देण्यात आली.
या धमकीत कॉल करणाऱ्याने स्वतःचे नाव ‘आरजू बिश्नोई’ असल्याचे सांगितले. फोनवरील धमकीमध्ये तो म्हणाला, ‘हॅलो, आरजू बिश्नोई बोलतोय. बी प्राकला मेसेज दे की 10 कोटी रुपये हवेत. तुझ्याकडे एक आठवड्याचा वेळ आहे. कोणत्याही देशात जाऊ शकतोस. आजूबाजूला याच्याशी संबंधित कोणीही सापडलं तर त्याचं नुकसान केलं जाईल. हा फेक कॉल समजू नकोस. आमच्याशी जुळवून घेतलंस तर ठीक नाहीतर त्याला मिट्टीत मिळवू’ अशी धमकी देण्यात आली आहे.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
हा ऑडिओ मेसेज मिळाल्यानंतर दिलनूरने तात्काळ 6 जानेवारी रोजी मोहाली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून कॉल आणि ऑडिओ मेसेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींना धमक्या देण्यात आल्या आहेत. अभिनेता सलमान खान, कॉमेडियन कपिल शर्मा, भोजपुरी अभिनेता पवन सिंह, अभिनेता राजपाल यादव यांसह अनेक मोठ्या नावांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात असतानाही त्याच्या टोळीतील सदस्य खुलेआम सेलिब्रिटींना धमकावत खंडणीची मागणी करत आहेत हे अधिकच धक्कादायक मानले जात आहे.