Badhshah : बादशाहशी नातं संपताच ईशा रिखीने उचललं मोठं पाऊल, सोशल मीडिया..
गायक बादशाह आणि त्याची पत्नी ईशा रिखी यांच्यातील दुराव्याच्या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्नानंतर अवघ्या 5 महिन्यात दोगे वेगळे झाले, त्याच्यासोबत नातं तुटताच ईशाने आणखी एक मोठा निर्णय घेतला.

प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा प्रचंड चर्चेत आला आहे. पत्नी ईशा रिखीशी झालेले त्याचे मतभेदामुळे चाहते तर हैराण झाले. त्या दोघांनीही परस्परसंमतीने वेगळं होण्याचा निर्णयही जाहीर केला. याबद्दल बादशाह यानेच एक पोस्ट केली होती. अवघ्या 5 महिन्यांपूर्वी बादशाह आणि ईशा यांचं लग्न झालं होतं. सोशल मीडियावर त्यांनी तशी जाहीर घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर एवढ्याशा काळात दोघांमध्ये आलेला दुरावा आणि त्यांनी नातं तोडण्याचा घेतलेला निर्णय यामुळे चाहते चांगलेच निराश झाले.
सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो
एवढंच नव्हे तर बादशाह आणि ईशा रिखी या दोघांनी सोशल मीडियावर, इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. एवढंच नव्हे तर ईशाने आणखी एक मोठं पाऊल उचललं. तिने तिच्या प्रोफाईलवरून बादशाहशी निगडीत सर्व जुन्या पोस्ट्स आणि फोटोही हटवले. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात दोघांनी उचललेल्या या पावलामुळे त्यांचे मतभेद तर सार्वजनिक झालेच, पण सोशल मीडियावरही विविध चर्चांना उधाण आलं.
ईशाच्या पोस्टमधून मिळाले होते दुराव्याचे संकेत
दोघांच्या नात्यात आलेल्या दुराव्याचे संकेत जुलै महिन्यातच मिळू लागले होते, जेव्हा ईशा हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. काही लढाया अशा असतात ज्यांच्या कोणत्याही बाह्य खुणा दिसत नाहीत, असं तिने आपल्या मनातील वेदना व्यक्त करत लिहिलं होतं. बराच काळ मी भीतीपोटी शांत राहिले, कारण मला वाटत होतं की माझ्या पतीकडे खूप मोठा प्रभाव, ताकद आणि संसाधने आहेत. मात्र शांत राहणे म्हणजे परिस्थिती स्वीकारणे नव्हे, तर स्वतःला सावरण्याचा एक मार्ग होता, असं तिने नमूद केलं होतं. आता मी भीतीपेक्षा धैर्याची निवड करत्ये आणि सगळं काही ठीक असल्याचं भासवणे थांबवत्ये, असंही लिहीलं होतं. मात्र तिची ही पोस्ट आता तिच्या अकाऊंटवर उपलब्ध नाही.
व्हिडिओ कोलाजमधून वेदना व्यक्त
याशिवाय, ईशा हिने आणखी एका पोस्टमध्ये व्हिडिओ कोलाजही शेअर केला होता. या व्हिडिओच्या सुरुवातीला बादशाह आणि ईशा यांच्या आनंदी क्षणांची झलक पाहायला मिळत होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे आणि कुटुंबासोबतचे फोटो दाखवण्यात आले होते. मात्र, व्हिडिओच्या शेवटी एक असा फोटो होता, ज्यामध्ये ईशा रडताना दिसत होती आणि बादशाह तिला मिठी मारताना दिसत होता. या पोस्टसोबत तिने तुटलेल्या हृदयाचा आणि हात जोडल्याचा इमोजी वापरला होता. प्रत्येक वादळ एक शिकवण देऊन जाते आणि प्रत्येक प्रार्थनेत एक आशा दडलेली असते, असं तिने लिहीलं होतं.
अचानक आलेल्या दुराव्यामुळे चाहते हैराण
ईशाच्या क्रिप्टीक पोस्ट आणि आता सोशल मीडियावर एकमेकांना पूर्णपणे अनफॉलो केल्यानंतर, चाहते प्रचंड हैराण झालेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्नाची आनंदाची बातमी दिल्यानंतर हे दोघे अचानक अशा प्रकारे वेगळे झाल्याच्या बातम्यांनी सर्वांनाच धक्का बसला .