
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली. यानंतर अनेक भारतीय पाकिस्तानी सेलिब्रिटींना पाण्यावरून ट्रोल करत आहेत. त्यातच आता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारलेली अभिनेत्री हर्षाली मल्होत्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने नेटकऱ्यांशी तक्रार केली आहे. लोक तिला पाकिस्तानी अभिनेत्री समजून पाणीवरून प्रश्न विचारत असल्याचं तिने सांगितलं आहे. हर्षालीने ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नी नावाच्या पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे तिला काही लोक खऱ्या आयुष्यातही पाकिस्तानी असल्याचं समजत आहेत. यावरूनच हर्षालीने नाराजी व्यक्त केली.
हर्षालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘मुन्नी, तुला पाणी मिळतंय ना’, असा सवाल नेटकऱ्यांनी तिला केला आहे. यावर हर्षालीने लिहिलं, ‘एका चित्रपटात भूमिका साकारली म्हणून सर्वजण मला पाकिस्तानी समजत आहेत.’ हर्षालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली हर्षाली आता बरीच मोठी झाली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हर्षालीने स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा सुरू केला आहे. त्यावरही ती विविध व्हिडीओ पोस्ट करत असते. हर्षाली मल्होत्राला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्क्रीन अवॉर्ड आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर अवॉर्ड मिळाला. या चित्रपटाशिवाय तिने ‘कुबुल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाला शनिवारी विराम देण्याचं ठरवण्यात आलंय. दोन्ही देशांतील शस्त्रसंधीची पहिली घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यानंतर भारताने द्विपक्षीय चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ठामपणे म्हटलंय. लष्करी संघर्ष थांबवला असला तरी सिंधू जलकरार स्थगितीसह अन्य राजनैतिक निर्बंध कायम राहतील, असंही भारताने स्पष्ट केलं आहे.