Sanjay Dutt : संजय तू काळजी करू नकोस…सर्वांनी सोडलेली साथ, पण बाळासाहेब ठाकरे होते पाठीशी; काय घडलेलं?
Sanjay Dutt : संजय दत्त अडचणीत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेत्याला मदत केलेली. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते चित्रपट कारकिर्दीपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत राहिल्या. मात्र, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणानंतर संजय दत्तला बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झाली आणि त्याच्या कुटुंबावर मोठं संकट ओढावलं. मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी वडील आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी अनेक प्रयत्न केले. त्यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मदत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान संजय दत्तचं नाव समोर आलं. त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि टाडा कायद्यांतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संजय दत्तच्या अटकेनंतर त्याचे वडील सुनील दत्त प्रचंड अस्वस्थ झाले होते. ते स्वतः काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ राजकीय नेते होते. तरीही मुलाच्या सुटकेसाठी त्यांना राजकीय स्तरावर अपेक्षित मदत मिळत नव्हती. त्यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले; मात्र परिस्थितीत फारसा फरक पडत नव्हता.
या कठीण काळात अभिनेते राजेंद्र कुमार यांनी सुनील दत्त यांना बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला सुनील दत्त या सल्ल्यामुळे नाराज झाले होते. कारण काँग्रेसमध्ये असलेल्या सुनील दत्त यांचे आणि शिवसेनेचे राजकीय विचार वेगळे होते. मात्र, मुलाच्या भवितव्याचा प्रश्न असल्यानं त्यांनी अखेर बाळासाहेबांची भेट घेण्यास होकार दिला. राजेंद्र कुमार यांनीच सुनील दत्त यांना मातोश्रीवर घेऊन गेले. या भेटीपूर्वी त्यांनी सुनील दत्त यांना शांत राहण्याचा सल्लाही दिला होता.
बाळासाहेबांनी दिला मदतीचा शब्द
सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय दत्तच्या प्रकरणात मदतीचे प्रयत्न सुरू झाले. बाळासाहेबांनी सुनील दत्त यांना धीर दिला आणि संजयला मदत करण्याचं आश्वासन दिलं. संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे यांनीही एका मुलाखतीत बाळासाहेबांनी या प्रकरणात केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला होता. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर टाडा प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याच्या प्रक्रियेत बाळासाहेबांनी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितलं होतं. या समितीनं संजय दत्तच्या बाजूनं शिफारस केली होती. मात्र, टाडा न्यायालयानं ती मान्य केली नव्हती. त्यानंतर बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याशी संपर्क साधून संजयच्या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केल्याचंही सांगितलं जातं.
१८ महिन्यांनंतर संजय दत्तला मिळाला जामीन
संजय दत्तने या प्रकरणात सुमारे १८ महिने तुरुंगात घालवले. १९९५ मध्ये त्याला जामीन मिळाल्यानंतर तो सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी गेला होता. बाळासाहेबांनी कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल संजयने त्यांचे आभार मानले होते. संजय दत्तने अनेक मुलाखतींमध्ये बाळासाहेबांविषयी आदर व्यक्त केला होता. बाळासाहेब त्याला नियमितपणे धीर देणारे मेसेज पाठवत असत. ‘संजय, काळजी करू नकोस, मी आहे इथे’, असं बाळासाहेब संजयला सांगायचे.
संजय दत्तची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नरगिस दत्त यांचेही बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या बाळासाहेबांना आपला भाऊ मानत असत. आयुष्यात कधी अडचण आली, तर बाळासाहेबांकडे मदत मागायला जा, असा सल्ला त्यांनी दिल्याचं सांगितलं जातं.सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय विचार वेगवेगळे असले, तरी या कठीण प्रसंगात बाळासाहेबांनी केलेली मदत संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबासाठी महत्त्वाची ठरली.
