
अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतंच तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

तेजस्विनीनं नुकतंच रक्त दान केलं आहे. सध्या राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहता हे एक उत्तम कार्य तिनं पार पाडलं आहे. या संबंधित काही गोष्टी तिनं तिच्या या पोस्टमध्ये नमुद केल्या आहेत.

‘अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे...- असं माझे बाबा म्हणायचे.’ असं म्हणत तिनं ही पोस्ट लिहिली आहे, पुढे ती म्हणाली, ‘झाकल्या मूठीने मदत केली की लोक म्हणणार तुम्ही काहीच करत नाही...केलेली मदत दाखवली की म्हणणार पब्लिसिटी साठी केली....जमेल तशी केली की म्हणणार एवढीशी का केली ? पण 'तेवढीशी ' का होईना केली ना, किमान हातावर हात धरून तर नाही बसलो....!’

एवढंच नाही तर आपण ही पोस्ट का शेअर करत आहोत हे सुद्धा तिनं चाहत्यांना सांगितलं आहे. ‘समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा.- ( ही पण माझ्या बाबांची शिकवण ) पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लगतं. कारण कलाकार कॅमेराच्या मागेही अभिनयच करत असतो असं बहुतेकांना वाटतं... पण तसं नाही आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्याची जाण मला एक कलाकार म्हणून आहे, कारण मुळात कलाकार हा संवेदनशीलच असतो... समाजातील एकाला जरी माझ्या ह्या कृतीतून प्रेरणा मिळाली तरी माणूस म्हणून काहीतरी करू शकले याचं समाधान असेल.’

यापुढेही अशीच कधी झाकल्या मुठीने तर कधी असं जाहीर करुन मदत करत राहणार असल्याचं तिनं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. तेजस्विनीची ही पोस्ट अनेकांना प्रेरणा देणारी ठरतेय.