
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 19 एप्रिल रोजी शुभांगीचा पूर्व पती पियुष पुरेचं निधन झालं. लिव्हरशी संबंधित आजारानंतर त्याने या जगाचा निरोप घेतला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शुभांगी तिच्या पूर्व पतीविषयी बोलताना भावूक झाली. या मुलाखतीत तिने सांगितलं की पियुष व्यसनाधीन झाला होता. लग्नानंतर तो व्यसनाच्या आहारी गेला. त्याच्या याच सवयीला वैतागून शुभांगीने घटस्फोट घेतला होता. लग्नाच्या 22 वर्षांनंतर शुभांगी आणि पियुष विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर शुभांगी तिच्या मुलीचं संगोपन एकटीच करतेय.
शुभांगी म्हणाली, “पियुषने 2018 मध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. त्यादरम्यान त्याने काही स्टेरॉइड्स घेतले होते. तो दारुसुद्धा रोज प्यायचा. जेव्हा सर्वकाही माझ्या सहनशक्तीपलीकडे गेलं, तेव्हा 2020 मध्ये मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मला कोणाशीच कोणतीही तक्रार नाही. परंतु मी जेव्हा वर जाईन, तेव्हा पियुषला एक प्रश्न नक्कीच विचारेन की, त्याने मला आणि मुलगी आशीला सोडून दारुला का निवडलं? मी कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतरही त्याची आर्थिक मदत करत होती. घटस्फोटाच्या कागदांवर सही करतानाही मी पियुषला त्याच्या लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याचा सल्ला देत होती.”
पियुष पुरेचं 18 एप्रिल 2025 रोजी निधन झालं होतं. दीर्घ काळ लिव्हर सिरॉसिस (liver cirrhosis) या आजाराशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली होती. पियुषच्या निधनानंतर शुभांगीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर शुभांगीने तिच्या पतीला सोडल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती.
या टीकेवर शुभांगीने सडेतोड प्रतिक्रिया देत घटस्फोटामागचं खरं कारण सांगितलं होतं. “संपूर्ण गोष्ट माहीत नसताना लोकांबद्दल मत बनवणं खूप सोपं असतं. मला यश मिळालं म्हणून मी त्याला सोडलं, असं लोकांना वाटतंय. पण ते खरं नाहीये. अनेक वर्षं संघर्ष केल्यानंतर आम्ही विभक्त झालो. मी यशस्वी झाले म्हणून त्याला सोडलं नाही, तर त्याच्या व्यसनाला वैतागून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्याच्या दारूच्या व्यसनाचा आमच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला होता. व्यसनाने त्याला उद्ध्वस्त केलं आणि त्याचा परिणाम आम्हा सर्वांवर झाला होता,” असं तिने स्पष्ट केलं होतं.