पूर्व पतीच्या निधनाच्या 8 दिवसांनंतर मराठी अभिनेत्रीने सांगितलं घटस्फोटामागील खरं कारण

शुभांगीने 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती, परंतु 2007 मध्ये आलेल्या 'कस्तुरी' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने 'दो हंसो का जोडा', 'चिडिया घर', 'अधुरी कहानी हमारी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 2016 मध्ये तिने लोकप्रिय 'भाभीजी घर पर है' या मालिकेत शिल्पा शिंदेची जागा घेतली आणि अंगुरी भाभी म्हणून ओळख मिळवली.

पूर्व पतीच्या निधनाच्या 8 दिवसांनंतर मराठी अभिनेत्रीने सांगितलं घटस्फोटामागील खरं कारण
Shubhangi Atre and her ex husband Piyush
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 27, 2025 | 9:33 AM

‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत ‘अंगुरी भाभी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शुभांगीचा पूर्व पती पियुष पुरेचं 18 एप्रिल 2025 रोजी निधन झालं. दीर्घ काळ लिव्हर सिरॉसिस (liver cirrhosis) या आजाराशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. पियुषच्या निधनानंतर शुभांगीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर शुभांगीने तिच्या पतीला सोडल्याची टीका नेटकऱ्यांनी केली. शुभांगी आणि पियुष यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. पतीच्या निधनानंतर अखेर शुभांगीने ट्रोलिंगवर मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिची बाजू आणि घटस्फोटाचं खरं कारण सांगितलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी म्हणाली, “त्याच्या निधनाच्या दोन दिवस आधीच 16 एप्रिल रोजी मी त्याच्याशी बोलले आणि तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. मी सध्या खूप भावूक आणि सुन्न झाले आहेत. मला पियुषच्या फक्त चांगल्या आठवणी लक्षात ठेवायच्या आहेत. मी लवकर इंदूरमध्ये असलेल्या त्याच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. आमची मुलगी आशी सध्या अमेरिकेत शिक्षण घेतेय. अंतिम परीक्षेनंतर ती भारतात येईल, तेव्हा आम्ही दोघी इंदूरला जाऊ.”

22 वर्षांच्या संसारानंतर शुभांगी आणि पियुष विभक्त झाले होते. शुभांगीने प्रसिद्धी मिळताच पतीची साथ सोडली, अशी टीका नेटकऱ्यांकडून झाली. याबद्दल ती म्हणाली, “संपूर्ण गोष्ट माहीत नसताना लोकांबद्दल मत बनवणं खूप सोपं असतं. मला यश मिळालं म्हणून मी त्याला सोडलं, असं लोकांना वाटतंय. पण ते खरं नाहीये. अनेक वर्षं संघर्ष केल्यानंतर आम्ही विभक्त झालो. मी यशस्वी झाले म्हणून त्याला सोडलं नाही, तर त्याच्या व्यसनाला वैतागून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्याच्या दारूच्या व्यसनाचा आमच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला होता. माझा संसार वाचवण्यासाठी मी सगळे प्रयत्न केले, पण ते सर्व नियंत्रणापलीकडे गेलं होतं. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवूनही काही फरक पडला नाही. आमच्या दोन्ही कुटुंबीयांनी त्याची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण व्यसनाने त्याला उद्ध्वस्त केलं आणि त्याचा परिणाम आम्हा सर्वांवर झाला.”

2018-2019 मध्ये शुभांगी आणि पियुषच्या नात्यात खूपच तणाव निर्माण झाला होता. त्यानंतरही शुभांगीने संसार वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पियुषच्या बाजूने काही प्रयत्न न झाल्याने अखेर ते विभक्त झाले. याविषयी तिने पुढे सांगितलं, “घटस्फोटानंतरही मी पियुषच्या संपर्कात होते आणि त्याला मदत घेण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्याच्या कुटुंबीयांसोबतही माझे खूप चांगले संबंध आहेत. दारूचं व्यसन हे केवळ व्यक्तीला उद्ध्वस्त करत नाही तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकावर, खासकरून मुलांवर त्याचा खूप परिणाम होतो. माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलीवर त्याचा परिणाम झाला. म्हणूनच मला घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला.”