
‘भाभीजी घर पर है’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनंतर प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती या मालिकेला असते. या मालिकेचं यश इतकं मोठं आहे की त्यावर आता एक चित्रपटसुद्धा बनतोय. परंतु प्रेक्षकांमधील एक वर्ग असाही आहे, जो या मालिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करतो. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अनेक अश्लील आणि दुहेरी अर्थाचे विनोद (डबल मिनिंग जोक्स) ऐकायला मिळतात, असा आरोप या प्रेक्षकवर्गाकडून केला जातो. मालिकेतील अंगुरी भाभीच्या तोंडी असे अनेक डायलॉग असतात, ज्यावरून अनेकदा वाद झाला आहे. मालिकेवर उपस्थित केल्या जाणाऱ्या या प्रश्नांवर आता त्यात तिवारीजींची भूमिका साकारणारे अभिनेते रोहिताश्व गौर यांनी मौन सोडलं आहे.
‘डिजिटल कमेंट्री’शी बोलताना रोहिताश्व यांना या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, “आम्ही एक अशी कथा केली ज्याला एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाकडून खूप पसंती मिळाली. त्याचवेळी, दुसऱ्या वर्गाने त्यावर टीका केली आणि असा दावा केला की विभूती नारायण मिश्रा ट्रिपल एक्स चित्रपट बनवत आहेत. जर तुम्ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर हे खूप मजेशीर आहे. परंतु एका विशिष्ट वर्गाने त्यावर जोरदार टीका केली म्हणून आम्ही ते बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते करत राहू. परंतु आजकालच्या जेन-झी प्रेक्षकांसाठीही काही गोष्टी केल्या जातात, हे सत्य आहे.”
रोहिताश्व यांनी पुढे रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचं उदाहरण देऊन समजावलं. “या चित्रपटात शिवीगाळचा भडीमार आहे, जे मी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर ऐकलं. फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच गोष्टी बदलत आहेत आणि समाज एका वेगळ्या मार्गावर पुढे जातोय. त्यामुळे मार्केटवरही त्याचा परिणाम होत आहे”, असं मत त्यांनी मांडलं. यावेळी त्यांनी ‘भाभीजी घर पर है’ या चित्रपटाविषयीही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत जाण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. “हा चित्रपट म्हणजे हास्याचा एक रंजक प्रवास असेल, ज्यामध्ये भरपूर विनोद असेल. मालिकेतील सर्व गाजलेली पात्रेदेखील चित्रपटात पहायला मिळतील”, असं ते पुढे म्हणाले. ‘भाभीजी घर पर है’ हा चित्रपट 6 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.