भोजपुरी अभिनेते रवी किशन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील ‘या’ सदस्याचं निधन

आता वर्षभराच्या आतच राम किशन यांनी जगाचा निरोप घेतला. वर्षभराच्या काळातच दोन्ही भावांना गमावल्याने रवी किशन यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भोजपुरी अभिनेते रवी किशन यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील या सदस्याचं निधन
Ravi Kishan
Image Credit source: Facebook
| Updated on: Feb 05, 2023 | 5:03 PM

मुंबई: भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रवी किशन यांचे मोठे बंधु राम किशन शुक्ला यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रवी किशन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. बंधु राम किशन यांचा फोटो पोस्ट करत रवी किशन यांनी शोक व्यक्त केला.

‘माझे मोठे बंधु राम किशन शुक्ला यांचं मुंबईतील नानावटी रुग्णालयात दुपारी 12 वाजताच्या सुमारास निधन झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो’, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केलं. या पोस्टवर भोजपुरी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी कमेंट करत राम किशन यांना श्रद्धांजली वाहिली.

दिनेश लाल उर्फ निरहुआ, आम्रपाली दुबे, अक्षरा सिंह, राजेश नायर यांसारख्या कलाकारांनी कमेंट लिहित शोक व्यक्त केला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रवी किशन यांच्या आणखी एका मोठ्या भावाचं निधन झालं होतं. रमेश शुक्ला असं त्यांचं नाव होतं. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली होती.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता वर्षभराच्या आतच राम किशन यांनी जगाचा निरोप घेतला. वर्षभराच्या काळातच दोन्ही भावांना गमावल्याने रवी किशन यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राम किशन हे मुंबईत राहून रवी किशन यांच्या प्रॉडक्शनचं काम पाहायचे. रविवारी दुपारी काम करताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राम किशन हे रवी किशन यांच्या तीन भावंडांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ होते. त्यांना 25 वर्षांचा एक मुलगा आहे. तर त्यांच्या पत्नीचं आधीच निधन झालं होतं.