
ग्लॅमर विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी काही वर्षांपर्यंत काम केल्यानंतर इंडस्ट्रीला रामराम केला. काही जणांनी इंडस्ट्री सोडून भक्तीचा मार्ग स्वीकारला. अशाच सेलिब्रिटींमध्ये भोजपुरी अभिनेत्री प्रियांका पंडितचाही समावेश आहे. प्रियांकासुद्धा अभिनय विश्व सोडून कृष्ण भक्त बनली आहे. तिने वृंदावनमध्ये आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर तिथे तिने गुपचूप लग्नसुद्धा केलंय. लग्नानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियांका ही एकेकाळी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती.
प्रियांकाचा जन्म जौनपूरमध्ये झाला. तिने 50 हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावलं आहे. कलाविश्वात ती चांगलं काम करत होती. परंतु अचानक एकेदिवशी तिचा बॉयफ्रेंडसोबत MMS लीक झाला. या व्हायरल एमएमएसनंतर तिचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं होतं. परंतु नंतर तो MMS फेक अर्थात बनावट असल्याचं स्पष्ट झालं होतं. परंतु या घटनेनंतर प्रियांकाला काम मिळणं बंद झालं आणि तिचं करिअर उद्ध्वस्त झालं.
प्रियांकाने भोजपुरी इंडस्ट्रीतील खेसारी लाल यादव, पवन सिंह आणि रितेश पांडे यांसारख्या स्टार्ससोबत काम केलं होतं. परंतु एका फेक MMS मुळे तिची प्रतिमा मलिन झाली. या घटनेनंतर प्रियांका अध्यात्माकडे वळली आणि ती कृष्णभक्तीत लीन झाली. आता ती वृंदावनमधील प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांची अनुयायी बनली आहे.
प्रियांका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यातून तिच्या बदललेल्या आयुष्याची झलक पहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु या फोटोंमध्ये तिच्या पतीचा चेहरा पहायला मिळत नाही. तिने ज्या अकाऊंटसोबत कोलॅब केलंय, त्या अकाऊंटचं नाव हरिसेवक असं आहे. त्यामुळे प्रियांकाचा पतीसुद्धा कृष्णभक्त असल्याचं समजतंय. लग्नानंतर प्रियांकाचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. ती पतीसोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. परंतु कोणत्याही फोटो किंवा व्हिडीओमध्ये तिने त्याचा चेहरा दाखवलेला नाही.